८४ कोटी रु. खर्चून मच्छीमार खात्याचा उपक्रम
शापोरा, मालिम, कुठ्ठाळी व कुटबण या चार मच्छीमारी जेटींचा मच्छीमारी बंदरे म्हणून विकास करण्याचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असल्याचे मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांनी सांगितले.
या विकासकामांवर एकूण ८४ कोटी रु. खर्च करण्यात येणार आहे.
या योजनेखाली शापोरा जेटीचा विस्तार करण्यात येणार असून जेटी १०० मीटर एवढी होणार आहे. त्याशिवाय तेथे रिव्हर ट्रेनिंग, ब्रेक वॉटर (सुरक्षिततेसाठी किनार्यावर बांधण्यात येणारी भिंत) आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय सर्व बंदरांवर मासळी लिलावासाठीची शेड, ट्रॉलर नांगरून ठेवण्यासाठीची मोठी जागा, ट्रॉलर दुरुस्तीसाठीची सुविधा अशा कित्येक सुविधा असतील.
मच्छीमारी बंदरांसाठी खात्याने सल्लागाराची नेमणूक केली होती. त्यांनी केलेल्या सूचनांनुसारही बंदरांवर सुविधा उभारण्यात येणार आल्याचे डॉ. मोंतेरो म्हणाल्या.
मच्छीमारी बंदी काळात रु. २७०० मिळणार
दरम्यान, मच्छीमार व मासळी विक्रेत्यांना मासळी बंदीच्या काळात जो प्रत्येकी १८०० रु. चा निधी देण्यात येत असतो तो १८०० रु. वरून २७०० रु. एवढा वाढवण्यात आला आहे. यापैकी ९०० रु. संबंधीत मच्छीमारांच्या वेतनातून कापून घेण्यात येतील. ९०० रु. मच्छीमारांच्या मालकाकडून तर ९०० रु. सरकार देणार असल्याचे त्या म्हणाल्या. मच्छीमारी बंदीच्या काळात मच्छीमारांचे वेतन मिळत नसल्याने ही सोय करण्यात आलेली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.