चांद्र मोहिमेचा आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

0
35

>> विक्रम लँडर मुख्य यानापासून वेगळा

>> आता प्रतीक्षा 23 ऑगस्टची

भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या काल पूर्ण झाला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर हे मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉड्यूल) वेगळे झाले आहे. इस्रोने काल ही माहिती दिली.

चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर मॉड्यूल हे प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे चांद्रयान-3 चा आतापर्यंतचा प्रवास नियोजित वेळेत पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

चंद्रावर उतरण्यापूर्वी चांद्रयान-3 ची वाटचाल ही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केली जात आहे. चंद्राभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या चांद्रयान 3 मोहिमेतील एक महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. शुक्रवार दि. 18 ऑगस्टला विक्रम लँडरची कक्षा आणखी कमी जाईल आणि ते आणखी चंद्राजवळ आणले जाईल, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.

चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडले. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत आणण्यासाठी प्रवास सुरू केला. चांद्रयान-3 द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. मोहिमेचे सर्व टप्पे नियोजित वेळेत पार केल्यास चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असे इस्रोने म्हटले आहे.