अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गेले काही महिने चर्चेत असलेल्या इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटा इथून चांद्रयान-3 अवकाशात झेप घेणार आहे. त्या दिवसाची आणि वेळेची घोषणा काल भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोने केली.
इस्त्रोचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम3-एम4 हे महाकाय रॉकेट हे उड्डाणाच्या ठिकाणी चांद्रयान-3 ला घेऊन पोहचले आहे. आता लवकरच त्यामध्ये इंधन भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि हवामान अनुकूल असेल, तर नियोजित वेळी रॉकेट गर्जना करत अवकाशात झेप घेईल.
चांद्रयान-3 चे उड्डाण हे जरी 14 जुलैला होणार असले तरी चंद्रावर यान उतरण्यासाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे. अवकाशात गेल्यावर चांद्रयान-3 हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करेल. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना पृथ्वीपासूनचे अंतर वाढवले जाईल आणि एका त्यानंतर एका विशिष्ट अंतरावरुन ते चंद्राकडे रवाना होईल. चंद्राच्या कक्षेत पोहचल्यावर काही दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मगच चांद्रयान-3 हे चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर अलगद उतरल्यावर रोव्हर हा प्रत्यक्ष चंद्राच्या जमिनीवर संचार करणार आहे. या मोहिमेतून चंद्राचा प्रत्यक्ष अभ्यास केला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्रावर अलगद यान आणि रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे.
मागील चांद्रयान-2 मोहिमेत काय झाले होते?
चांद्रयान-2 मोहिम ही जुलै 2019 ला झाली आणि ऑगस्ट महिन्यात चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र वेग नियंत्रित न झाल्याने चंद्रावर उतरणारे लँडर हे चंद्राच्या जमिनीवर आदळले होते आणि त्याचे तुकडे झाले होते. मात्र या मोहिमेत चंद्राभोवती एक उपग्रह हा कक्षेत स्थिर करण्यात इस्त्रोला यश आले होते. हा उपग्रह चंद्राभोवती अजूनही फिरत असून, त्याने चंद्राच्या जमिनीचा नकाशा तयार केला आहे.