चांदरचा अंतिम फेरीत प्रवेश

0
121

चांदर क्लबने सां जुझे दी आरियलचा टायब्रेकरवर ५-३ असा पराभव करत ब्र. युलालियो वाझ स्मृती फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल शुक्रवारी डीबीओ मैदान मुरिडा येथे झालेल्या या सामन्यात लिस्टन डिकॉस्टा, मार्कुस मास्कारेन्हस या आरियलच्या आघाडीपटूंनी अनुक्रमे तिसर्‍या व सहाव्या मिनिटाला गोलसंधी वाया घालवल्या.

चांदरच्या लुई नोरोन्हा व मोझेस डिसा यांनी नवव्या व १२व्या मिनिटाला गोलसंधी वाया घालवली. यानंतर मोझेस डिसा याने रचलेल्या चालीवर रिचर्ड डिसाने लगावलेला फटका आरियलचा बचावपटू नेव्हिल फर्नांडिस याला लागून गोलजाळीत विसावल्याने १४व्या मिनिटाला चांदरने १-० अशी आघाडी घेतली. ४६व्या मिनिटाला आरियलच्या लिस्टन डिकॉस्टाचा फटका चांदरच्या गोलरक्षकाने शिताफीने अडवला. रिचर्ड डिसा चांदरची आघाडी २-० अशी फुगवण्यासाठी सज्ज झालेला असतानाच आरियलचा गोलरक्षक ऍगी आंतावने प्रयत्न हाणून पाडला. ५०व्या मिनिटाला आरियलच्या क्लिफर्ड सुआरिसचा फटका गोलबारला लागून बाहेर गेला. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना मेलिशो कामातियो याच्या क्रॉसवर नेव्हिल फर्नांडिसने हेडरद्वारे गोल करत आरियलला १-१ अशी बरोबरी साधून दिली. टायब्रेकवर चांदरकडून ज्योकिम कार्व्हालो, इरफान याडवड, साफिक शेख व डॅनियल कॉस्टा यांनी तर आरियलकडून बर्सल व्हिएगस व ऍलिस्टन कामातियो यांनी गोल केले. चांदर व दिकरपाल एससी यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.