चांगले शिक्षक घडवण्याचे आव्हान

0
332
  • सौ. निलांगी शिंदे

आज ऑनलाइन प्रशिक्षणाचा डोलारा जसा आपण सर्वांनी सक्षमपणे पेललेला आहे, तसेच नवीन शिक्षणपद्धतीचे शिवधनुष्यदेखील लीलया पेलू अशी सदिच्छा व्यक्त करते. विद्यार्थी घडवणं, ज्ञानदान आणि ज्ञानप्रसार हे कार्य अव्याहतपणे त्यांचं सुरू राहीलच. त्यांना मुक्तपणे श्‍वास घेण्याची संधी द्या. शिक्षकदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी माझे काही विचार इथे मांडू इच्छिते. शिक्षक हे बालकाचे मातेनंतर प्रथम गुरू मानले जातात. त्यांना कितीतरी विशेषणे लावली जातात. पण वास्तविकता अशी आहे की शिक्षक आणि शिक्षकी पेशा यावर ताशेरे ओढणारे लोकही समाजामध्ये खूप आहेत. आता संचारमाध्यमांमुळे आणि वाणी स्वातंत्र्यामुळे हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं. याला कारणीभूत आपल्या आजूबाजूची व्यवस्थादेखील आहे. आस्थापनांव्यतिरिक्त शाळेतील विविध कामे, उपक्रम, सरकारी कामें जशी विविध सर्व्हे, निवडणुकांची कामे, रेशनच्या दुकानांचा सर्व्हे, जनगणना यांसारखी इतकी कामे लादली जातात की या सगळ्यामधून शिक्षक स्वतःला विकसित करील तर तो कसा… यावर कुणीच विचार करत नाहीत.
शिक्षक एक माणूस, समाजातील घटक, जबाबदार नागरिक आणि कुटुंबातील कर्ता व्यक्ती असतो, हे सर्वजण विसरत असतात. शाळेची कामेही घरीच येऊन करायची असतात. वह्या, पेपर तपासणी, स्वाध्याय तपासणी, वार्षिक, मासिक, साप्ताहिक नियोजन, दुसर्‍या दिवशी शिकवायच्या पाठांची तयारी हे सगळं करून जेव्हा अन्य कामांमध्ये व्यस्त राहावं लागतं तेव्हा विचार करा.. एका शिक्षकाची काय स्थिती होईल?
आजचं युग हे वैज्ञानिक युग आहे. शिक्षकांसमोर फार मोठी आव्हाने आहेत. शिक्षक हा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला, विचाराने प्रगल्भ, मानवतावादी दृष्टिकोन असणारा आणि एक प्राचीन आणि अर्वाचीन ज्ञानाची सांगड घालून ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणारा असला पाहिजे. त्यासाठी वाचन करणारा, प्रत्येक गोष्टीकडे विशाल दृष्टीने पाहणारा, प्रत्येक नवीन गोष्ट आत्मसात करणारा असा शिक्षकच उन्नत समाज घडवू शकेल.

आजच्या शिक्षक प्रशिक्षण पद्धतीमध्ये तांत्रिकता ज्यादा आल्यामुळे त्यातील आत्मा निघून गेला की काय अशी स्थिती आहे. तत्कालीन स्थितीचं भान ठेवून विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील ऊर्जास्रोत विकसित करून त्याला मानवतावादी दिशा देणं हे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये झिरपलं पाहिजे.

पोकळ पांढरपेशी जीवनाचे धडे न मिळता विद्यार्थी आत्मनिर्भर कसे बनतील. विद्यार्थी मानसिकरीत्या कमजोर न बनता सक्षमपणे आपल्या विचारांना मांडू शकतील असा आत्मविश्‍वास त्यांच्यामध्ये शालेय जीवनापासूनच यावा अशी अनेक आव्हाने शिक्षक म्हणून आपल्यासमोर आहेत. विद्यार्थी हा व्यसने, पैसे कमवायच्या सोप्या पद्धती, बाह्याचार, व्यभिचारी वर्तनाकडे सहज आकर्षित होत आहे. अशा अनेक पद्धती आणि साधने मुलांच्या हातात आहेत. या सर्व प्रलोभनांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याची क्षमता शिक्षणपद्धतीमध्ये आणि पर्यायाने शिक्षकांमध्ये असणे गरजेचे आहे.

आजदेखील शिक्षकांकडे लोकांची पाहण्याची दृष्टी कशी असते की त्यांनी सर्वगुणसंपन्न, बुद्धिमान, निर्व्यसनी, कलाकार, प्रसंगी नाट्यलेखक, उत्कृष्ट दिग्दर्शक, गायक आणि मुख्य म्हणजे पालक असावं. प्राचीन काळात गुरूंकडे पाहण्याची जी दृष्टी होती, सहसा तीच दृष्टी आज आहे. आपल्याकडे डॉक्टर्स, इंजिनिअर्सना भरती करण्यासाठी ज्या परीक्षा किंवा प्रक्रियांना सामोरं जावं लागतं, विदेशात तशाच प्रकारच्या कठोर प्रक्रियांना शिक्षक प्रशिक्षण प्रवेशासाठी तयार राहावं लागतं. जे पिढी घडवतात, समाजाचे सक्षम नागरिक घडवण्याचे काम करतात त्यांच्या प्रवेशासाठी कोणते निकष असतात?
यापुढे चांगले डॉक्टर्स-इंजिनिअर्स नाहीत तर चांगले शिक्षक घडवण्याचे आव्हान आज आपल्या पिढीसमोर आहे. यासाठी आजचा शिक्षक सक्षम हवा, तर त्याच्यावर असलेली विविध दडपणे, विविध जबाबदार्‍यांची ओझी कमी करावी लागतील. शिक्षकांना कमी लेखणं, नोकर समजणं, सतत गृहीत धरणं बंद केलं पाहिजे. दडपणरहीत शिक्षकच चांगल्या प्रकारे ज्ञानदान करू शकेल, जेणेकरून अध्यापन आणि अध्ययन कार्य सुगठित होऊ शकतं. शिक्षकांनी स्वतःला आजच्या प्रणालीमध्ये टाकून, चिकित्सक, वैज्ञानिक, सृजनशील, रचनात्मक आणि प्रभावशाली बनवण्यासाठी हर प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत. उत्तमोत्तम वाचन, सद्यःस्थितीची माहिती तथा अभ्यास, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठीचा कल आपला असला पाहिजे.

आज ऑनलाइन प्रशिक्षणाचा डोलारा जसा आपण सर्वांनी सक्षमपणे पेललेला आहे, तसेच नवीन शिक्षणपद्धतीचे शिवधनुष्यदेखील लीलया पेलू अशी सदिच्छा व्यक्त करते. शिक्षक हे कुठल्या सन्मान-सत्काराचे भुकेले नाहीत. विद्यार्थी घडवणं, ज्ञानदान आणि ज्ञानप्रसार हे कार्य अव्याहतपणे त्यांचं सुरू राहीलच. त्यांना मुक्तपणे श्‍वास घेण्याची संधी द्या. शिक्षकदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!