- डॉ. मनाली महेश पवार
ही जैवविविधता आपण जपली पाहिजे. या पर्यावरण संवर्धनासाठी आपण जागरूक झाले पाहिजे, म्हणूनच 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतात. निसर्गाचे संवर्धन, निसर्गाची आसक्ती, ओढ, निसर्गाचा अभ्यास, निसर्ग कोपल्यावर होणारी जीवितहानी या सर्वांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
निसर्ग व मानवजातीमध्ये अतूट असे नाते आहे. ‘इथे मानव चुकला तिथे निसर्ग कोपला!’ हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने जशी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही निसर्गाची पंचमहाभूते दूषित कराल तसेच आपले शरीर दूषित म्हणजे आजारांच्या विळख्यात सापडेल. निसर्गाचे संवर्धन हेच आपले संवर्धन!
माणसाने तांत्रिकदृष्ट्या एवढी प्रगती केली आहे की माणूस निसर्गाला आव्हान देऊ लागला आहे. स्वतःची एकट्याची मालमत्ता असल्यासारखा वापरू लागला आहे. वृक्षतोड, जंगलतोड, खनिजांसाठी खाणी खोदकाम, प्लास्टिकचा अतिवापर, हवा-नद्या-समुद्र यांचे प्रदूषण अशा अनेक गोष्टींनी आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवले आहे. या पृथ्वीवरील कितीतरी प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती माणसांमुळे नष्ट झाल्या आहेत. आपण फक्त आता त्या चित्रात बघू शकतो. ही जैवविविधता आपण जपली पाहिजे. या पर्यावरण संवर्धनासाठी आपण जागरूक झाले पाहिजे, म्हणूनच 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतात. निसर्गाचे संवर्धन, निसर्गाची आसक्ती, ओढ, निसर्गाचा अभ्यास, निसर्ग कोपल्यावर होणारी जीवितहानी या सर्वांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
मानवी जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. निसर्ग कोपला म्हणजे वेळी-अवेळी पाऊस, पूर, वादळे, भूकंप, उल्कापात, पेटलेले वणवे इत्यादी नैसर्गिक हानी व त्यातून मानवी जीवितहानी होते. निसर्गचक्राच्या असंतुलनाने जशी मोठमोठी नैसर्गिक आपत्ती येते, तसेच पर्यावरणाच्या असंतुलनामुळे वेगवेगळी रोगराई पसरते.
माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी जमिनीचे उत्खनन सुरू केले. यातून भूमीतील महत्त्वाची खनिजे नष्ट झालीत. भूमीचा स्वाभाविक वर्ण, गंध, रस, स्पर्श विकृत झाला. जमिनीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणांमधील कोणताही अवांछित बदल- ज्याचा मानवावर आणि इतर प्राण्यांवर प्रभाव पडतो किंवा जमिनीची नैसर्गिक गुणवत्ता आणि उपयुक्तता कमी होते- त्याला ‘भूमी प्रदूषण’ म्हणतात. या जमिनीचा योग्य आणि योग्य वापर करणे हे आता संपूर्ण जगाचे कर्तव्य आहे. तथापि, जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे व मानवाच्या स्वार्थापायी जमिनीचा वापर अधिक वैविध्यपूर्ण आणि दाट झाला आहे. परिणामी, त्याचा अयोग्य पद्धतीने वापर केला जात आहे, म्हणूनच ‘जमीन प्रदूषण’ ही समस्या उद्भवते आहे.
माती प्रदूषणाची कारणे
घरगुती कचरा ः घन कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे साहित्य, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच घर, हॉस्पिटल, शाळा आणि बाजारात वापरल्या जाणाऱ्या इतर साहित्यांचा समावेश होतो. काही बायोडिग्रेडेबल आहे, परंतु इतर नाहीत. जैवविघटन न करता येणारा कचरा हा जमिनीच्या प्रदूषणाचा प्राथमिक स्रोत आहे.
जंगलतोड ः खाणकाम, नागरीकरण आणि वृक्षतोडीमुळे जमीन प्रदूषित होते.
रासायनिक कचरा ः रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे अवघड झाले आहे.
खतांचा वापर ः कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा अतिवापर जमीन प्रदूषित करत आहे.
घरगुती, औद्योगिक, नगरपालिका, कृषी आणि खाण कचरा हे घटक जमीन दूषित करत आहेत.
जमिनीच्या दूषिततेमुळे मानवी आरोग्य, पिके आणि वनस्पती या सर्वांवर नकारात्मक परिणाम होत आहे.
दूषित जमिनीवर लागवड केलेल्या भाज्या आणि फळे खाल्ल्याने रोगांचा प्रसार होऊ शकतो.
शेतीचे उत्पन्न कमी, परिणामी आम्हाला चांगले अन्न मिळत नाही.
जमिनीचे प्रदूषण विविध प्रकारच्या कर्करोगांशी निगडीत आहे.
डांस, माश्या, उंदीर आणि इतर कीटक दूषित भागात वाढतात. या छोट्या जिवांमुळे रोग पसरतात. परिणामी अनेक प्रकारचे ताप आणि संसर्ग वाढत आहे. म्हणून प्रदूषणाचे व्यवस्थापन करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा.
जिथे व्यावहारिक असेल तेथे बायोडिग्रेडेबल वस्तू वापरा.
कीटकनाशके आणि खतमुक्त अन्न उत्पादनांना प्रोत्साहन द्या. जमत असल्यास घरीच (टेरेस, गार्डन) सेंद्रिय भाज्या उत्पादनावर भर द्या.
पॉलीबॅगऐवजी कापडाच्या पिशव्यांचा वापर करा.
प्लास्टिक भांडी किंवा इतर उत्पादने टाळा.
ओला व सुका कचरा दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये वेगळा ठेवा. हे खूप महत्त्वाचे आहे. ही सवय घरापासूनच लावा.
कागदाचा वापर मर्यादित ठेवा. दरवर्षी कागद बनवण्यासाठी कितीतरी वृक्षतोड होते व परिणामी जमीन दूषित होते.
टिश्यूऐवजी कापड वापरा.
दूषित जमिनीबरोबरच इतर प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका संभवतो.
जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपून वापरावे. पिण्यायोग्य पाण्यात प्रदूषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे. काही कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये बदल झाल्यास ते पाणी पिण्यासाठी अपायकारक बनते. अशा पाण्याला प्रदूषित पाणी असे म्हणतात. जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जिवाणूंची उत्पत्ती होते. असे जिवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार, उलटी, कावीळ, विविध ताप इत्यादींचा समावेश असतो.
जलप्रदूषणाची कारणे
औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडणे.
सांडपाणी जलाशयात सोडणे.
रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने.
पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने.
कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने.
जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने.
अंत्यसंस्कारानंतरची राख किंवा इतर धार्मिक कार्यातील निर्माल्य, नैवेद्य वगैरे नदीमध्ये टाकल्याने.
रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनामुळे.
जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
कचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सूचना करणे, त्यांना रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.
औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्योगात सक्तीचा करावा.
सेंद्रिय शेतीचा वापर करावा. शेतामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मर्यादित वापर करा.
शाडूमातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरून सणांचा आनंद घ्या.
धार्मिक कार्यातील निर्माल्य नदीमध्ये टाकू नका.
अशा प्रकारे जल दूषित होण्यापासून वाचवावे.
जमीन व पाण्याबरोबर हवेच्या प्रदूषणाची समस्याही तेवढीच तीव्र होत चालली आहे. जगण्यासाठी सर्व सजीवांना प्राणवायूची गरज असते. वातावरणातील हवेमध्ये दूषित अपायकारक घटक मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होते. यामुळे हवेची गुणवत्ता खालावते. अशी हवा आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागते. त्यालाच वायू प्रदूषण म्हणतात.
वायू प्रदूषणाची कारणे
वाढती लोकसंख्या, शहरीकरण.
कारखान्यांतून बाहेर पडणारा विषारी वायू.
बेसुमार वृक्षतोड, लाकडांचा जळणासाठी उपयोग.
अमर्यादित वाहनांचा वापर. वाहनांमुळे होणारे प्रदूषण.
फ्रिज, एसीचा अतिवापर.
कीटकनाशके, जंतुनाशके यांचे सोडलेले फवारे.
वायुप्रदूषणामुळे आरोग्य समस्या निर्माण होतात. श्वसनक्रियेत अडचणी येतात. दमा, खोकला, सर्दी-पडसे यांसारखे श्वसनसंबंधी त्रास निर्माण होतात. श्वसनमार्ग व फुफ्फुसाचे रोग निर्माण होतात. त्याचप्रमाणे हृदयासंबंधी विविध आजार निर्माण होतात. कॅन्सरसारखे दुर्धर आजारही होऊ शकतात. काहींची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. वनस्पतींवरही विषारी वायूचा परिणाम होतो. झाडांची वाढ खुंटते, झाडे मरतात किंवा उत्पन्न कमी देतात.
वायुप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
वृक्ष लागवड करून झाडांचे संवर्धन करा.
वृक्षतोड, वणवा यांसारख्या संकटांपासून झाडे वाचवा.
पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर मर्यादित करा.
इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वाहनांचा वापर करा. सगळ्यात उत्तम म्हणजे सायकलचा वापर करा.
सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या.
उघड्यावर कचरा जाळणे टाळा.
अशाप्रकारे वरील उपायांचा वापर करून काही अंशी आपण हवा प्रदूषण रोखू शकतो.
आपल्या जीवनाच्या सुख-सोयीसाठी, आपला दर्जा वाढवण्यासाठी आपण पर्यावरणाचा ऱ्हास करीत आहोत. त्यामुळे माती, पाणी, हवा दूषित होत आहे. या दूषित पर्यावरणामुळे सजीवांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटत आहे. मानव नेहमी तणावग्रस्त जीवन जगताना दिसत आहे. तेव्हा स्वतःपासून सुरुवात करून पर्यावरण, निसर्गसंवर्धनाचा प्रत्येकाने विडा उचलूया…