चला, चारा लावू…!

0
11
  • संजीव कुंकळ्येकर

उसाखालील जमिनी जर चारा लागवडीखाली आल्या तर गोव्यातील पशुपालन आणि दूध उत्पादन क्षेत्रात मोठा फरक पडेल. हे आव्हान शेतकरी, पशुपालक, दूधसंघ व सरकार यांनी एकत्रितपणे स्वीकारायचे आहे. ऊस उत्पादक आणि दूधकार यांच्यावर आलेले संकट संधीत परावर्तित करण्याची ही चालून आलेली संधी आहे. चारा उत्पादक शेतकरी, दूधकार, पशुपालन खाते, शेतकी खाते, राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थान यांनी संयुक्तपणे असे अभियान तीन वर्षांसाठी चालवले तर गोव्यात धवलक्रांती निश्चित आहे. किमान दूध क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता व स्वयंपूर्णता साध्य करणे मुळीच कठीण वाटत नाही.

सर्वात जास्त आतुरतेने वाट पाहिली जाणारी नैसर्गिक घडामोड म्हणजे वर्षाऋतूचा प्रारंभ. वैयक्तिक, कौटुंबिक अर्थकारण ज्या पावसावर अवलंबून आहे त्या पावसाचे वेध शेतकऱ्याला लागणे साहजिकच आहे. पावसाच्या पाण्यावर पोसलेल्या शेतात उदरभरणासाठी लागणारे अन्न पिकते. परंतु शेतीशी कुठलाही संबंध नसलेली व्यक्तीसुद्धा पावसाच्या आगमनाच्या बाबतीत म्हणजे मृगनक्षत्राच्या मुहूर्ताच्या बाबतीत बरीच संवेदनशील असते. तसे आपल्या संस्कृतीत सगळे ऋतू व्यवस्थित परिभाषित आहेत; पण पावसाळ्याइतकी संवेदनशीलता कुठेच दिसत नाही. पर्जन्य ऋतूत संपूर्ण समाजमन गुंतलेले असते आणि तसे ते सहजतेने व्यक्तही होत असते. पावसाच्या आगमनाबरोबर निसर्गात सर्वत्र अनेक बदल एकाएकी घडलेले आढळतात. निसर्गात घडणारे हे बदल मानवी जीवनावरसुद्धा प्रभावीपणे परिणाम करतात.

भारतीय उपखंडातील शेती हा सर्वात मोठा व्यवसाय आहे आणि शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबित आहे. शेतकऱ्यासाठी पावसाळा निसर्गातील बदलांबरोबरच अनेक अधिकच्या कारणांसाठी महत्त्वाचा असतो. पुढे येणारा हिवाळा आणि उन्हाळा कसा असेल याची गणिते पावसाळ्याच्या कामगिरीवर अवलंबून असतात.
मागच्या पिढीतील शेतकरी रब्बी हंगामासाठी आपल्या विहिरीत किती पाणी राहील किंवा गावातील ओढा, पाणवठा किती काळ प्रवाही राहील याचा विचार करायचा, तर आजचा शेतकरी त्याच्या शेतापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणात किती पाण्याचा साठा आहे या विवंचनेत असतो, इतकाच काय तो फरक. जमिनीची स्थिती तीच कायम आहे. पिढी-दोन पिढ्यांमागचा शेतकरी पहिल्या पावसात सकाळी सकाळी बैलजोडी जुंपून नांगरणी करण्यात व्यस्त दिसायचा. घरातील सगळी कर्ती मंडळी- अगदी बाल्यावस्थेतली मुलेही आपापल्या कुवतीप्रमाणे शेतात गुंतलेली दिसायची. आजचा शेतकरी पॉवर टीलर घेऊन राबतो किंवा नांगरणीसाठी महिनाभर आधी आरक्षणाचे अर्ज दिल्यानंतर येणार असलेला ट्रॅक्टर कधी येईल याची वाट पाहत शेताच्या बांधावर उभा असलेला दिसतो.

पावसाळ्याची पूर्ण तयारी हे मोठे काम असते. काही वर्षांपूर्वी शेतातील कुणगीच्या मध्ये दिसणारे शेणाचे छोटेसे ढीग आताशा दिसत नाहीत. आता शेतकरी पूर्वतयारी म्हणून योग्य बियाण्यांची खरेदी, रासायनिक खतांची निवड व खरेदी, तणनाशके, कीटकनाशके यांची फवारणी, वापरायची मात्रा अशा प्रकारच्या चौकश्यांसाठी अधिकारी, जाणकारांना भेटणे, पैशांची जमवाजमव करणे, रसायनाची खरेदी करून वेळेत आणणे, आवेदन नमुने भरणे, मंजूर झालेल्या निविष्ठांच्या पावत्या सादर करणे, अनुदानासाठी हेलपाटे अशी कामे शहरातील दुकानांत किंवा विभागीय कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयात करण्यासाठी चकरा मारतो.

शेती करण्याची तंत्रे वेगाने बदलत आहेत. बी-बियाणी बदलली, पीक काढणीला येण्याचा काळ बराच कमी झाला. विपणन, तेजी-मंदी, शेतमालाची बाजारातील आवक, सरकारचे आयात-निर्यात धोरणातले बदल असे अनेक मुद्दे जे शेतकऱ्याच्या नियोजनाच्या आवाक्याबाहेरचे असतात, ते शेतकऱ्याचे उत्पन्न ठरवण्यात महत्त्वाचे ठरत आहेत. बाजाराची मागणी आणि गरज यांच्या अपेक्षेला पात्र ठरणारा शेतकरी हळूहळू का होईना प्रयत्नपूर्वक स्वतःला तयार करू लागला आहे. पारंपरिक पिके आणि मशागतीच्या पद्धती यांच्यात योग्य बदल करून स्पर्धेला तोंड देण्यास शेतकरी सज्ज होताना दिसत आहे.

पहिल्या पावसात फळ येईल असे नियोजन गोव्यातील पावसाळी मळे करणारा शेतकरी प्रयत्न आणि कष्टपूर्वक करतो आहे. भर उन्हाळ्यात त्यासाठी महिनाभर राबतो आहे. रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला आपली उत्पादने विकण्याची व्यवस्था करून स्थानिक, ताजे, थेट शेतातून- अशा भावना आपल्या ग्राहकांच्या गळी उतरवण्यात शेतकरी यशस्वी होताना दिसत आहे. यासाठी लागणारे नियोजन एखाद्या कॉर्पोरेट मॅनेजरच्या तोडीचेच असते. पारंपरिक भाजी पिके आणि त्याबरोबरच स्थानिक नसलेली व्यापारी महत्त्वाची भाजी पिके मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे- अगदी व्यापारी पातळीवर- घेणारे शेतकरी गोव्यात निर्माण होत आहेत. सध्या अशी उदाहरणे संख्येने कमी असली तरी यशस्वी शेतीसाठीचे नवे दालन या मोजक्या मंडळीनी उघडे केले आहे. या थोडक्या तरुण शेतकऱ्यांचे यश अनेकांना प्रेरणा देणारे ठरो. ढबू मिर्ची, कोबी, फुलकोबी, इतकेच काय टॉमेटो आणि फागलां यांची व्यापारी उद्देशाने लागवड करून बाजारात आणलेली लवकरच दिसतील असे संकेत आहेत. कारण काहींनी अभ्यासपूर्वक या क्षेत्रात पावले टाकली आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला गोव्यातील शेती-बागायतींचा धांदोळा घेताना काही बाबी सहजतेने लक्षात येतात. त्यात बागायती (कुळागार)- काजू आणि नारळाची भाटे सोडल्यास- बहुतेक पिकांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. नापिकीची सुरुवात हळूहळू जाणवायला लागली आहे. गेल्या वर्षी वापरलेले खत यंदा दुपटीने वापरले तरी अपेक्षित फलधारणा झाली नाही असा निराशेचा सूर गोव्यातील मोसमी फळभाज्या घेणाऱ्या मळेवाल्यांकडून ऐकायला येतो आहे.

पीक बदलणे, एकाच वेळी वेगवेगळी पिके घेणे, अधिकाधिक सेंद्रीय, जैविक किंवा प्राकृतिक शेतीकडे वळणे गरजेचे बनले आहे. रसायनमुक्त, गो-आधारित जैविक शेती ही भविष्यातील शेतीपद्धती असेल. स्थानिक बाजाराच्या गरजा, आपल्याकडील जमीन, पाणी आणि साधने अशा बाबींचा विचार करून पारंपरिक शेतीपेक्षा वेगळ्या शेती व्यवसायाचा विचार करणे योग्य ठरेल. पारंपरिक शेतीमध्ये नवाचार आणणे, शेतीबरोबर पशुपालन, शेळीपालन, पक्षीपालन, मधमाशी पालन अशांपैकी काही प्रकारांना शेतीचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. प्राणी किंवा पक्षी यांना वगळून शेती व्यवसाय म्हणून करणे कठीण आहे हे सत्य लवकर समजून घेतले पाहिजे. गो-आधारित शेती हा यशस्वी शेतीचा राजमार्ग आहे.

नेहमीच्या पिकांपेक्षा वेगळ्या पण स्थानिक जल-वायू-जमीन यांना सुसंगत असलेल्या दोन पिकांची चर्चा कृषितज्ज्ञाकडे झाली होती. या पिकांची विशेष चर्चा करणे योग्य वाटते. अशी दोन पिके म्हणजे नारळाच्या भाटांमधील मोकळ्या जागांमध्ये यशस्वीपणे सिद्ध झालेली दालचिनी (तिखी) आणि विविध प्रकारची चारा पिके. दालचिनी पश्चिम घाटामधले नैसर्गिक झाड आहे. लागवडीसाठी सोपे, स्थानिक परिस्थितीशी जुळलेले, काटक, रोगमुक्त, घनदाट पद्धतीच्या लागवडीसाठी योग्य असे रोकड (कॅश पीक) आहे. सर्वत्र उपद्रव असलेल्या माकड व इतर रानटी जनावरांच्या जाचापासून मुक्त आहे. भारत दालचिनी मोठ्या प्रमाणात आयात करतो. तसेच दालचिनीला निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे माडाच्या लागवडीखालील भाटांमध्ये मोकळ्या जागेत योग्य असे हे पीक आहे. मसाला, औषधी आणि खादप्रवर्तक असल्याने दालचिनी-आधारित प्रक्रिया उद्योगासाठी मोठा वाव आहे. दालचिनीबद्दल मार्गदर्शन आणि मदत करणारे विषयतज्ज्ञ वैज्ञानिक आपल्याकडे उपलब्ध आहेत.
पशुपालन हा गोव्यात परंपरेने चालत आलेला उद्योग आहे. परंतु उद्योग म्हणून बघण्यापेक्षा घर-कुटुंबाची गरज पुरवणारी आणि शेतीसाठी खत पुरवणारी व्यवस्था अशाच दृष्टीने पशुपालनाकडे बघितले गेले आहे. थोडक्यात, धंदा किंवा जोडधंदा म्हणून गोपालनाकडे अगदी अलीकडेसुद्धा बघितले जात नव्हते. आजच्या घडीलासुद्धा पशुपालन हा व्यवसाय अनेक प्रयत्न करूनही गोव्यात उभा राहू शकला नाही. पशुपालन यशस्वी होणे हे शेती यशस्वी होण्यासाठीची प्राथमिक गरज आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती मानली जाऊ नये. याच्याही पुढे जाऊन विषमुक्त अन्न निर्मितीसाठी पशुपालन ही अट आहे. शेती आणि पशुपालन उद्योग म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर शेती आणि पशुपालन एकमेकांस पूरक ठरल्यास यश अधिक सोपे असेल.

सध्या गोव्यात चाऱ्याची प्रचंड टंचाई आहे. आपल्याकडे स्वतःचा चारा योग्य प्रमाणात कधीच नव्हता. भातशेतीतून आलेले गवत आणि जंगली करड ही दोन्ही दूध उत्पादनाच्या दृष्टीने चारा म्हणून निकृष्ट मानली जातात. भातशेतीचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. जे थोडेफार तयार होते ते यांत्रिक मळणीतून नष्ट होते. करड कापून आणणे कापणी खर्चामुळे परवडत नाही. अशा कारणांमुळे गोव्यात आपले स्वतःचे गवत ना के बराबर! अगदी थोडे दूधकार शेतकरी स्वतःचा चारा पिकवतात, पण गरज आणि उत्पादन यांचे प्रमाण बघितल्यास गोव्यात ओला किंवा सुका चारा नगण्य आहे. चाऱ्यासाठी आपण पूर्णपणे शेजारच्या कर्नाटकावर अवलंबून आहोत.
सध्या कर्नाटकातून चारा येणे बंद आहे आणि चुकून आलाच तरी दर्जा, वजन, दर अशा सर्वच बाबतीत हा चारा परवडण्याजोगा नाही. चारा ही पशुपालनाची मूलभूत गरज असल्याने चारा परवडत नसेल तर पशुपालन परवडत नाही. याच कारणामुळे गोव्यात दूध धंदा कधीच भरभराटीला आला नाही आणि चारा परिस्थिती जोपर्यंत मोठ्या प्रमाणात सुधारणार नाही तोपर्यंत सगळे कठीणच आहे.

गोव्यात चारा पीक लागवड व चारा प्रक्रिया हा मोठा वाव असलेला उद्योग आहे. पडीक असलेल्या शेतजमिनी, माडांच्या भाटामधली मोकळी जमीन, काजूच्या लागवडीखाली असलेली मोकळी जमीन ही चारा लागवडीखाली येऊ शकणारी संभाव्य स्थाने आहेत.

सध्याच्या चाराटंचाईमागची काही कारणे खरी आहेत; तर या खऱ्या कारणांचा उपयोग करून मानवनिर्मित कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली आहे. त्याचा विचार करता कर्नाटकमधून येणाऱ्या चाऱ्याच्या भरवशावर राहाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. कारण कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी करण्याचा रोग जो व्यापाऱ्यांना जडला आहे त्याचा बळी गोव्यातील दूध उत्पादक ठरणार आहे. हा रोग तात्कालिक नाही तर जोपर्यंत त्यावर योग्य उतारा शोधला जाणार नाही तोपर्यंत साठेबाजी आणि दरवाढ बळावत जाणार आहे.
चाराटंचाईवर तात्कालिक उपाय म्हणजे अन्य प्रदेशांतून चारा आणणे. चारा वजनाला हलका असतो, लांबून आणणे खर्चीक असते. थोडक्यात स्वतःसाठी आपणच चारा निर्माण करणे हाच एकमेव तोडगा डोळ्यांसमोर दिसतो. साठेबाजी हे मोठे कारण असले तरी अन्य छोट्या कारणांवरही विचार झाला पाहिजे.

ज्वारी, बाजरी, मका ही अतिशय महत्त्वाची चारा पिके आहेत, तर हरभरा, तूर अशी चारा म्हणून उत्तम असली तरी वस्तुमान कमी असल्याने व्यापारयोग्य नसतात (वरील सर्व पिकांचे धान्य कापून उरलेल्या अवशेषांना सुका चारा म्हटले जाते). तर गहू, नाचणी, चणे अशा पिकांच्या अवशेषांना कमी दर्जाचे मानले जाते. कर्नाटकची किनारपट्टी सोडल्यास उरलेल्या भागात वरील पिके मोठ्या प्रमाणात येतात. ओला चारा म्हणजे मका आणि क्वचित बाजरी गोव्यात जवळच्या बेळगाव जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या भागातून येतो, तर सुका चारा संपूर्ण कर्नाटकातून आणला जातो. व्यवस्थित निर्माण झालेली व्यापारी साखळी या व्यवसायात आहे. चारा कुट्टी करणे आणि तो गोवा आणि महाराष्ट्रात पुरवणे हा कर्नाटकात मोठा धंदा आहे.

ज्वारीची कणसे काढून घेतल्यानंतर उरलेल्या झाडाच्या अवशेषांना कडबा म्हटले जाते. ज्वारी हे कोरडवाहू म्हणजे कमी पाण्यावर होणारे पीक आहे. सिंचनाची व्यवस्था नसलेल्या क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. कर्नाटकात सिंचनावर भर दिला जात आहे. सिंचनाची व्यवस्था होताच ज्वारीला दुसरे पर्याय शोधले जातात. सोयाबीन हेसुद्धा कोरडवाहू पीक आहे. कमी दिवसात येते. अधिक पैसा देणारे ‘कॅश पीक’ आहे. सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत बऱ्यापैकी आहे. सरकार सोयाबीनला प्रोत्साहन देते. येथेही ज्वारीवरचे क्षेत्र सोयाबीनने बळकावले आहे. थोडक्यात, सोयाबीन गोव्यातील दूधकार शेतकऱ्यांना अडचणीचे ठरले आहे. अर्थात ज्वारीखालचे क्षेत्र थोडेसे कमी झाले म्हणजे कर्नाटकात एकाएकी ज्वारी संपली असे नाही तर ज्वारीच्या व पर्यायाने कडबा उत्पादनात थोडीशी घट झाली इतकेच. मात्र ज्वारीवरचे क्षेत्र अजून कमी होत राहील याचे स्पष्ट संकेत आहेत हेसुद्धा तितकेच खरे आहे.
उत्पादनात थोडीशी कमी आली की मागणी वाढते. बऱ्याच वेळा अशा गोष्टींना हवा देऊन फायदा उठवायला व्यापारी टपलेले असतात. कडब्याच्या बाबतीत हेच घडत आहे. कारणाशिवाय साठा करून ठेवणे, कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि पैसा करणे हे सध्या चालू आहे. ऐन सुगीच्या हंगामातच कडबा गायब होणे हे कारस्थान आहे. गेल्या वर्षी कडबा त्याच्या अधिकच्या वर्षापेक्षा 10 ते 15 टक्क्यांनी महाग झाला, तर या वर्षी गेल्या वर्षाच्या दुप्पट पैसे सांगूनसुद्धा कडबा मिळत नाही. संपूर्ण पावसाळा अजून बाकी आहे. कडबा नसणे किंवा सध्याच्या किमतीत तो खरेदी करून जनावरांचे फक्त पोट भरणे या परिस्थितीला तोंड देणे दूधकाराला शक्य होणार नाही हे स्पष्ट आहे. शेवटी ‘गोंयचो दूधकार’ अडचणीत आहे हे नक्की.
अडचणीचा असा डोंगर समोर असला तरी गोव्यातील शेतकऱ्यांसाठी चारा उत्पादनाची मोठी संधी चालून आली आहे असे म्हणायला हरकत नाही.

बहुतेक सर्व चारा पिके ही काटक आणि कठीण परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असतात. थोडीशी अनुकूलता आली की फोफावतात. कीड-रोग या पिकांना सहसा बाधत नाही किंवा बाधल्यास उपचारांना चांगली दाद मिळते. अनेक प्रकारची वाणे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी व प्रत्यक्ष मदत करण्यासाठी विषयतज्ज्ञ उत्सुक आहेत. अधिक माहिती आणि मदतीसाठी धारवाड विद्यापीठ चारा पिकावर मोठे काम करीत आहे. अनेक प्रगतिशील दूधकारांनी स्वप्रयत्नांनी चारा पिकांवर बरेच काम केले आहे. असे दूधकार आपल्या व्यवसायबांधवांना मदत करण्यास तत्पर आहेत.

उसाखालील जमिनीच्या वापराचे अनेक शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे. दुर्लक्ष झाले तर व्यवस्थित मशागतीखाली आणि संचनाखाली असलेल्या या जमिनी पडीक होऊ शकतात. या जमिनीवर वर्षात तीनचार वेळा चारा पीक काढता येईल व अजून पुढे जाऊन मुरघास (सायलेज) बनवण्यासाठी प्रक्रिया करता येईल. उत्पादक शेतकरी व पशुपालक अशा दोघांनाही बराच फायदा होईल किंवा असा चारा शेतकऱ्यांना मुरघास बनवण्यासाठी विकता येईल. मुरघास बनवून त्याचा वापर करून पंजाब, हरयाणा व गुजरात अशा प्रमुख दूध उत्पादक राज्यांमध्ये पशुपालन व दूध उत्पादनात मोठा सकारात्मक फरक पडला आहे. उसाखालील जमिनी जर चारा लागवडीखाली आल्या तर गोव्यातील पशुपालन आणि दूध उत्पादन क्षेत्रात मोठा फरक पडेल. अवघ्या साताठ महिन्यांत अशा प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून येतील. हे आव्हान शेतकरी, पशुपालक, दूधसंघ व सरकार यांनी एकत्रितपणे स्वीकारायचे आहे. ऊस उत्पादक आणि दूधकार यांच्यावर आलेले संकट संधीत परावर्तित करण्याची संधी चालून आलेली आहे. अभियान स्वरूपात हे काम करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींचा ‘मिशन मोड’मधील कामाचा आदर्श गोवा सरकारने स्वीकारावा.

चारा उत्पादक शेतकरी, दूधकार, पशुपालन खाते, शेतकी खाते, राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थान यांनी संयुक्तपणे असे अभियान तीन वर्षांसाठी चालवले तर गोव्यात धवलक्रांती निश्चित आहे. किमान दूध क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता व स्वयंपूर्णता साध्य करणे मुळीच कठीण वाटत नाही.