ममता बॅनर्जी यांचे काल गोव्यात आगमन होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव, पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे, मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी काल ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला.
ही सदिच्छा भेट असल्याचे मत ह्या नेत्यांनी मांडले असले तरी येणार्या काळात मोठ्या राजकीय घडामोडींची ही नांदी असल्याचे मत मृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी खासगीत काही पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
एका प्रादेशिक पक्षाच्या वजनदार नेत्याने आपला पक्ष तृणमूल कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याची सगळी तयारी काही दिवसांपूर्वी केली होती. पण नंतर या नेत्याने शेवटच्या क्षणी आपला विचार बदलल्याने ममता बॅनर्जीच्या हजेरीत होऊ घातलेले विलीनकरण होऊ शकले नाही.
टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूल कॉंग्रेसमध्ये
तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला टेनिसपटू लिएंडर पेससोबत ममता बॅनर्जी.
गोव्याचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टेनिसपटू लियांडर पेस यांनी काल ममता बॅनर्जी यांच्या हजेरीत तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. नंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचा टेनिसपटू झालो त्याचे श्रेय आपण ममतादिदींना देत असल्याचे सांगितले. आपण १४ वर्षांचा असताना ममता बॅनर्जी ह्या केंद्रीय क्रीडामंत्री होत्या. आणि टेनिसपटू बनण्यासाठी त्यांनी आपणाला तेव्हा खूप उत्तेजन व सहकार्य केल्यानेच आपण मोठा टेनिसपटू बनू शकल्याने पेस यांनी सांगितले. आता आपण टेनिसमधून निवृत्त झालेलो असून त्यामुळे बॅनर्जी यांच्या पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. बॅनर्जी ह्या गोव्यात एक नवी पहाट आणू पहात असल्याने आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे पेस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल ज्येष्ठ अभिनेत्री नफिजा अली यांनीही तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.