चर्चिलनीे खेळात राजकारण आणू नये ः आवेर्तानो फुर्तादो

0
108

पणजी (क्री. प्र.)
चर्चिल आलेमाव हे ‘पाकिटे’ वितरित करण्याचा सपाटा लावला असून त्यांनी खेळांत हे घाणेरडे राजकारण आणू नये असे आवाहन गोवा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षदाच्या निवडणुकीत आलेमाव यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री आवेर्तानो फुर्तादो यांनी काल पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केले. आवेर्तानो हे चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्‌स क्लबचे माजी गोलरक्षकही होत.
यावेळी आवेर्तानो यांनी गोवा फुटबॉल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष एल्विस गोम्स यांचेही अभिनंदन केले. विद्यमान अध्यक्ष एल्विस यांनी फुटबॉल क्षेत्राच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी चांगली कामगिरी केली असल्याचे ते म्हणाले.
चर्चिल हे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी त्यांना सहकार्य करणार्‍या क्लब्सना पैशांचे आमीष दाखवत असून त्यांनी खेळात राजकारण आणू नये, असे आवेर्तानो म्हणाले. मला सरकारचीही मदत मिळणार आहे. सरकारने अध्यक्षपदी निवडून आल्यास आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासनही दिल्याचे त्यांनी सांगितले. मला गोव्यातील एकूण १५० क्लब्सचा पाठिंबा असून काही क्लबशी संपर्क साधायचा बाकी आहे. मला खात्री आहे की, या क्लबांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
क्लबसाठी देण्यात येणारे मानधन वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या क्लब्सने चर्चिल यांच्या खोट्या आमिशांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. निवडून आल्यास तांत्रिक समितीत ब्रम्हानंद शंखवाळकर, डेरिक परेरा, निकोलास परेरा, सावियो मदेरा आणि अन्य माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश करण्याची आपली योजना असल्याचे आवेर्तानो म्हणाले.
तसेच त्यांनी यावेळी त्यांनी आपले पॅनेलही जाहीर केले.