चर्चबरोबर मंदिरांना आयकर कायद्यानुसार नोटिसा

0
104

>> जनतेची दिशाभूल करण्याचे विरोधकांचे प्रयत्न : भाजप

 

आर्चबिशपना आयकर खात्याने पाठविलेल्या नोटिसीचे भांडवल करून काही राजकीय नेते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चर्चलाच नव्हे तर मंदिरांनाही आयकर खात्याने नोटिसा पाठविल्या आहेत. निधीच्या रूपाने जमा झालेल्या पैशांची माहिती घेणे हे कायद्यात असून त्यानुसारच नोटिसा पाठविल्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. ख्रिश्‍चन बांधवांनी स्वत:ची दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन यावेळी काब्राल यांनी केले.
आयकर खात्याने पाठविलेल्या नोटिसांचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही, असा विश्वास काब्राल यांनी व्यक्त केला. कोणत्या कायद्याखाली वरील नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत याचा खुलासा करण्यासाठी भाजपने काल प्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट आर. के. पिकळे यांना बोलाविले होते. त्यांनी आयकर कायद्याखाली धार्मिक प्रतिष्ठान, शिक्षणिक तसेच औद्योगिक प्रतिष्ठानांना नोटिसा पाठवून हिशेब घेण्याची तरतूद आहे, असे पत्रकारांना सांगितले. आयकर खात्याने बिशपला नोटीस पाठविली आहे. मंदिरांमधील निधी पेटीत जमा होणार्‍या पैशांचीही आयकर खात्याला माहिती द्यावी लागते, कोणत्याही ट्रस्टच्या तिजोरीत असलेल्या निधीतील ८५ टक्के निधी निश्‍चित केलेल्या कार्यासाठी वापरला पाहिजे. उरलेल्या पैशांचाही हिशेब सादर करावा लागतो, असे पिकळे यांनी सांगितले.

बँक लॉकर विषयी
भीती निरर्थक : पिकळे
नोटाबंदीनंतर सरकार बँकांतील लोकरवरही नजर ठेवण्याच्या शक्यतेवर जनतेमध्ये चर्चा सुरू असली तरी सद्याच्या कायद्यानुसार विवाहित महिलेला ५०० ग्राम, अविवाहित महिलेला २५० ग्राम व प्रती पुरुषाला १०० ग्राम सोने ठेवण्याची तरतूद आहे. त्यामुळे त्याची सर्वसामान्यांना भीती नाही, असे एक ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट आर. के. पिकळे यांनी सांगितले. वरीलपेक्षा अधिक सोने असल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल व त्यासाठी पुरावे सादर करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.