- प्रतिभा कारंजकर
पाया पडणं हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. मोठ्यांच्या प्रती आदर दाखवण्याची ती एक पद्धत आहे. देवाच्या चरणी तर सगळेच लीन होतात, पण आईवडील, वडीलधारी माणसे यांच्या पायावर डोके ठेवून पाया पडायला लावणारी ही आपली संस्कृती थोरच म्हणावी लागेल.
आपण जेव्हा ‘पावले’ म्हणतो तेव्हा ती एकतर छोट्या बाळाची असतात किंवा संत-महंतांची. चरण थोरामोठ्यांचेच असतात; सर्वसाधारण लोकांच्या पायाला आपण पायच म्हणतो. देवाच्या पादुकांवर डोके ठेवून नतमस्तक होतो किंवा कुणा थोरामोठ्याची चरणधूळ माथी लावतो ते श्रद्धेपोटी. घरातल्या मोठ्या वडीलधार्या लोकांच्या पाया पडतो तो चरणस्पर्श.
श्रीरामाची किंवा श्रीकृष्णाची सावळी, दुडक्या चालीने राजभवनात इकडून-तिकडे चालत जाणारी बाळसेदार बालमूर्ती… पुढे मोठेपणी त्याच राम-पावलांनी घातलेल्या पादुका सिंहासनावर ठेवून चौदा वर्षं राज्यकारभार पाहाणारा त्याचा बंधू भरत. तसेच त्या पावलाच्या पदस्पर्शाने पावन झालेली अहिल्या. अशी ही पावले खरोखरच धन्य होय.
पावले देवादिकांची, मोठ्यांची, संतांची, गुरुजनांची, माता-पितरांची यांना नेहमीच आपण वंदन करून त्यांना मान देतो. त्यांच्या चरणी आपला माथा टेकवत आशीर्वचन मागत असतो. पावले सगळ्यांचीच वंदनीय असतील असे नाही, पण ती प्रत्येकासाठी महत्त्वाची मात्र असतात. तसा आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा देवाने काही प्रयोजन ठेवून बनवलेला आहे. आपल्या शरीराची रचनाच अशी केलीय की केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराचा कुठलाही भाग हा महत्त्वपूर्ण असतो.
एखाद्या नृत्यांगनेच्या पदलालित्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवलेली असते. तिची संगीतासह थिरकणारी पावले, त्यांचा प्रत्येक आविष्कार एक आनंददायी अनुभूती देणारा असतो. एखाद्या गिर्यारोहकासाठी आपल्या उद्दिष्टापर्यंत म्हणजे शिखराकडे त्याला घेऊन जाणारी त्याची पावलेच असतात. एखादेच असे उदाहरण असेल की ज्यात ‘पंगु लंघयते गिरीम’ असे पाहायला मिळते. पण त्यासाठी पराकोटीचे प्रयत्न लागतात. रांगणार्या बाळाने चालण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल त्याच्या माता-पित्याला एक अद्वितीय आनंद मिळवून देत असते. सुरुवातीला धडपडत पण पुन्हा उठून उभं राहत त्याचा चालण्याचा प्रयत्न हा स्तुत्य असतो.
सतत महिनाभर चालणारी पावले दरवर्षी नित्यनेमाने वारीला जाणार्या वारकर्यांसाठी पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस पुरी करणारी असतात. आणि त्या सावळ्या विठूला पाहताच त्याचे इतके दिवसांचे चालण्याचे श्रम क्षणात मिटून जातात. पायांचा शिणवठा गळून पडतो. विठ्ठलाचरणी माथा टेकवताना आपली चरणधूळ मंदिरापर्यंत पोचली यात त्याला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. पाया पडणं हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. मोठ्यांच्या प्रती आदर दाखवण्याची ती एक पद्धत आहे. देवाच्या चरणी तर सगळेच लीन होतात, पण आईवडील, वडीलधारी माणसे यांच्या पायावर डोके ठेवून पाया पडायला लावणारी ही आपली संस्कृती थोरच म्हणावी लागेल. समाजात काही मोठे काम करणार्या महनीय व्यक्ती असतात. त्यांच्या पायाला हाताने स्पर्श करून आपण आपली भावना पोचवतो. या पावलाकडे मात्र आपले बर्याचदा दुर्लक्ष होत असते. त्याच्याकडे म्हणावे तितके लक्ष देत नाही.
पाऊल आणि पाय दोन्ही शब्द ऐकायला एकसारखेच वाटतात कारण आपण तसा त्याचा वापर करत असतो. पण दोन्हीत फरक असतो. पाऊल म्हणजे पायाचा खालचा जमिनीला स्पर्श करणारा भाग. हा नाजुक, मुलायम असतो. ‘आपके पांव बहोत खूबसूरत है, इन्हे कभी जमीन पर मत उतारो’ असं त्याचं कौतुक होतं.
कुणाचे पाय राकट, दणकट, मजबूत असतात. त्यांची वृत्तीही तशीच असली तरी त्यांच्यासाठी ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ ही म्हण सार्थ होते. पाऊल कोमलांगी स्त्रीचे असेल तर तिने ते जपूनच टाकलेले बरे. ‘तू जपून टाक पाऊल जरा’ असा इशारा तिला मिळतो. चुकून तिचा पाय घसरला तर अनर्थ ओढवतो. पण पुरुषी पाय मात्र जमिनीत घट्ट रोवायचा असतो, आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. जिथे आपल्याला मान मिळत नाही, अपमान सोसावा लागतो तिथे आपण पुन्हा पाऊलसुद्धा टाकणार नाही अशी घोर प्रतिज्ञा करतो, पण आवडत्या माणसाच्या घरातून लवकर आपला पाय निघत नाही. थोरामोठ्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत आपण मार्गक्रमण करायचा प्रयत्न करत असतो, तर एखाद्या गुन्ह्याचा छडा लावताना गुन्हेगाराच्या पावलांच्या ठशांचा मागोवा घेत तपास केला जातो. एखाद्या चुकीचे प्रायश्चित्त घेताना त्या व्यक्तीचे आपण पाय धरून क्षमा याचना करतो. त्या पावलांना स्पर्श केल्याने समोरच्या माणसाच्या मनात दयेची भावना निर्माण होते. व्यवसाय-धंद्यामध्ये कुणी पुढे जात असलेला पाहून त्याचा पाय ओढायचा प्रयत्न केला जातो. शरीराचं वजन कमी करण्यासाठी पावलांना त्रास देत वॉक केला जातो. मोठ्या भावाच्या किंवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढची व्यवसायाची धुरा सांभाळली जाते. पाय चांगले दणकट असतील तर मनाजोगता प्रवास करणं शक्य होतं. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत वारकरी कित्येक मैल चालत विठू माऊलीच्या दर्शनाला पोचतात. बाळाने पहिलं पाऊल टाकायला उशीर केला की पालकांच्या मनात शंकांचं वादळ उठतं, कारण त्याच पावलांच्या जोरावर तो पुढे आपला जीवनप्रवास करणार असतो.
मागे एका अपघातात माझा पाय मोटरसायकलच्या चाकात अडकून पूर्णपणे गोल फिरला. एखाद्या कोंबडीची मान मुरगळून टाकावी तसा तो लोंबत होता ते बघून मला तर चक्करच आली. पण डॉक्टरच्या प्रयत्नांनी आणि आधुनिक मेडिकल फॅसिलिटीजमुळे माझं ते पाऊल पूर्णपणे पहिल्यासारखं झालं. मी जेव्हा जेव्हा टूरमधल्या लांब, अवघड वाटेने चालण्याच्या प्रसंगाला तोंड देऊन सर्वांच्या बरोबरीने गंतव्य ठिकाणी पोहचते तेव्हा तेव्हा त्या डॉक्टरांचे मी मनोमन आभार मानते. अपघातानंतर जेव्हा मी तीन महिने अंथरुणाला खिळून होते, माझ्या पायाकडे असहायपणे पाहत होते, त्यावेळी पायांचे महत्त्व काय हे मला चांगलेच कळले.
या लहानशा दोन पावलांवर आपल्या सबंध शरीराचा भार पडत असतो. ते पाऊल चालताना चुकून जरी जरा वाकडे पडले तरी जीवघेणी कळ डोक्यात जाते, आणि मुरगळल्यामुळे मोठे दुखणे मागे लागू शकते. ‘तू जपून टाक पाऊल जरा…’ हे वर्तणुकीच्या दृष्टीने जितके महत्त्वाचे आहे तितकेच शारीरिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. जीवनातला प्रवास असो वा रस्त्यावरचा प्रवास- यात काटेकुटे, खाचखळगे असणारच. जीवघेणी ठेच लागणारे दगडधोंडे असणारच. त्यातून सावधगिरीने मार्ग काढून आपले इप्तिस गाठता आलेच पाहिजे. असे हे पाऊल सरळ पडले पाहिजे, त्यासाठी त्याला संगतही चांगली असली पाहिजे. गरज पडलीच तर मार्गदर्शक गुरू तसेच आधाराला प्रसंगी काठीही आवश्यक आहे. मराठीत पावलावरून बर्याच म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. पाऊल वाकडे पडणे, पाय घसरणे, पाय ओढणे, पाऊल पुढे टाकणे, पाऊलखुणा उमटवणे, लाथ मारीन तेथे पाणी काढणे, अंथरूण पाहून पाय पसरावे, बुडत्याचा पाय खोलात यात पायांसाठी शब्दही वेगवेगळे आहेत. पाय, पाऊल, पद, पग, चरण, चरणकमल, पदद्वय, लाथ, तंगडी. लत्ता वगैरे.
या पावलांची महती सांगणार्या अनेक पुराणकथा आपल्याकडे पाहायला मिळतात. बटूच्या वेशात आलेला विष्णूचा वामन अवतार जेव्हा तीन पावले भूमी मागतो तेव्हा त्या पावलांची व्याप्ती आकाश, पाताळ, पृथ्वी हे तिन्ही लोक व्यापते इतकी अफाट आणि अचाट शक्ती त्यात असते. अशा पुराण कथांचा धागा पकडत काही ठिकाणी त्याचे पुरावे किंवा दाखलेही पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशात एके ठिकाणी विष्णुपद हे ठिकाण आहे. तिथे श्रीविष्णूच्या पावलाचा ठसा दगडात उमटलेला आहे. त्यावर दुधाचा अभिषेक केला जातो तेव्हा ते पाऊल मोठे आणि स्पष्ट दिसते. पंढरपूर येथेही विष्णुपद नावाच्या ठिकाणी जनाबाईसाठी प्रत्यक्ष पांडुरंग आले होते व त्यांच्या पावलाचे ठसे असे दगडात उमटलेले पाहायला मिळतात. खर्या-खोट्याची शहानिशा करत बसण्यापेक्षा भाविक भक्तिभावाने त्याचे दर्शन घेताना दिसतात. अशी आपली ही भारतभूमी प्रत्यक्ष परमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, ही भावनाच येथे श्रेष्ठ ठरते. आणि अशा या पवित्र भारतभूमीला चरणस्पर्श केल्याबद्दल वंदन करून म्हणावेसे वाटते –
समुद्र वसने देवे, पर्वत स्तन मंडले| विष्णु पत्नी नामोस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्वमे|