चतुर्थीनंतर चार दिवसांत १८६८ नवे रुग्ण

0
304

>> काल दिवसभरात ५२३ नवे कोरोनाबाधित

राज्यात श्रीगणेश चतुर्थीनंतर पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. काल दिवसभरात नवे ५२३ कोरोना रुग्ण काल आढळून आले. कोरोनाची सध्याची रुग्णसंख्या ३५३५ एवढी झाली असून एकूण रुग्ण संख्या १६,०००६ वर गेली आहे. कोरोनाने ४ रुग्णांचा काल दिवसभरात मृत्यू झाला. राज्यातील कोरोना बळींचा आकडा १७५ एवढा झाला आहे.

राज्यात मागील दोन दिवसांत ९५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तर, मागील तीन दिवसांत १४७६ रुग्ण आढळून आले आहेत.

आणखी चौघांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचे प्रकार सुरूच आहेत. काल आणखी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना बळींची संख्या १७५ वर पोहोचली आहे. नवावाडा वास्को येथील ५९ वर्षाच्या महिला रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये गुरूवारी निधन झाले. मुरगाव येथील ८४ वर्षाच्या महिला रुग्णाचे गोमेकॉमध्ये काल निधन झाले आहे. बायणा वास्को येथील ७० वर्षा पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात गुरूवारी निधन झाले. बेतोडा फोंडा येथील ५३ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात काल निधन झाले आहे.
काल ४२९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२,२९६ एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ३६६ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ४५१२ एवढी झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉच्या आयझोलेशन वॉर्डात १०८ कोरोना संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. आरोग्य खात्याने २९२२ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत, तर, प्रयोगशाळेतून ३००८ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल जाहीर केला असून ३३५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

मडगावात सर्वाधिक ५१८ कोरोना रुग्ण आहेत. वास्को येथे २४७, कासावली येथे ११४, फोंडा येथे २६९, नावेली येथे ११६ रुग्ण आहेत. उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक १७७ रुग्ण आहेत. पणजी येथे १७०, म्हापसा येथे १७१, खोर्ली येथे ११७, साखळी येथे ११३ तर पेडणे येथे १०१ रुग्ण आहेत.

श्रीपाद नाईक यांच्या
प्रकृतीत सुधारणा

कोरोनाचा संसर्ग झाल्याने दोनापावला येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत शुक्रवारी सुधारणा झाल्याने त्यांना हाय फ्लो नेसल ऑक्सिजनवरून आता सामान्य प्राणवायू पुरवठ्यावर ठेवण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या पथकाने घेतला असल्याची माहिती काल सदर इस्पितळातील सूत्रांनी दिली.
रक्तातील प्राणवायूचे प्रमाण खाली आल्याने त्यांना गुरुवारपासून हाय फ्लो नेसल ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.

रोज अर्ध्या कर्मचार्‍यांनिशीच काम करा

सचिवालयात कोरोना वाढल्याने फर्मान

पर्वरी येथील सचिवालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने येत्या ३१ ऑगस्टपासून दरदिवशी केवळ ५० टक्के कर्मचारी घेऊन कामकाज करण्याचा आदेश सर्वसाधारण प्रशासन खात्याने काल जारी केला आहे.

पर्वरी येथील सचिवालयात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला असून हा आदेश ११ सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहे.
सचिवालयातील कर्मचार्‍यांनी काही दिवसापूर्वी निदर्शने करून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्याची मागणी केली होती. सर्वसाधारण प्रशासन विभागाने प्रसिद्धी माध्यमासमोर कैफियत मांडणार्‍या काही कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता ५० टक्के कर्मचारी घेऊन कामकाज करण्याबाबत आदेश जारी केला आहे.