गणेश चतुर्थीच्या दिवसांत आपली शहरातील घरे बंद करून गावात सण साजरा करण्यासाठी जाणार्या लोकांची घरे फोडून चोरी केली जाऊ नये तसेच सार्वजनिक गणेशोत्सव स्थळी घातपातासारख्या गोष्टी घडू नयेत यासाठी पोलीस गस्त व पहारा यात वाढ केली जाणार असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक ओमप्रकाश मिश्रा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
या काळात जनतेने तसेच गणेशोत्सव मंडळानी कोणती काळजी घ्यावी याची माहितीही मिश्रा यांनी दिली. लोकांनी गावी जाताना आपल्या शहरातील घरात दागिने व अन्य मौल्यवान वस्तू मागे ठेवू नयेत. जाताना घराला मजबूत असे कुलूप ठोकावे, बाल्कनीत शिडी, दोर्या, लोखंडी सळ्या आदी चोरट्यांना घरफोड्या करण्यासाठी सोयीचे ठरेल असे साहित्य ठेवू नये. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, दुकानदारांनी दुकानात येणार्या ग्राहकांविषयी दक्षता बाळगावी, सुरक्षा रक्षक ठेवताना प्रसिद्ध अशा कंपनीचेच रक्षक ठेवावेत आदी विविध सूचना मिश्रा यांनी केल्या.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांना सुट्टी देण्यात येणार नसून रात्रीची गस्त वाढवण्यात येईल. महामार्गांवरही खास लक्ष ठेवण्यात येईल, असे मिश्रा यांनी यावेळी सांगितले. पोलिसांबरोबरच जनतेनेही दक्ष राहण्याची गरज असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावे अशी सूचनाही मिश्रा यांनी यावेळी केली.