>> राज्यभरात मोठ्या प्रमाणात पडझड; वीजही गायब
अरबी समुद्रातील कायर चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात पडणार्या जोरदार पाऊस व वार्यामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. वादळी वार्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्याच्या सुमारे ३०७ घटनांची नोंद अग्निशामक दलाकडे झाली आहे. वाहने, घरे, रस्त्यांवर झाडे मोडून पडली आहेत. नद्या, समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांची गैरसोय झाली. आज २६ रोजी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता कायर चक्रीवादळाचा केंद्र बिंदू राजधानी पणजीपासून अंदाजे २६० किलो मीटरवर होता. समुद्रातील चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
मेरशी सांताक्रुझ येथे जाणार्या रस्त्यावर चार खांब येथे पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांची गैरसोय झाली. कांपाल येथे आरोग्य खात्याच्या कार्यालयाजवळ एक झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने दिवाडी. चोडण येथील फेरी बोटीमधून प्रवास करणार्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.
अग्निशामक दलाने रस्ते, घरावर पडलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेतले असून सुमारे १५० ठिकाणची झाडे हटविण्याचे काम केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वास्कोत पडझडीमुळे मोठे नुकसान
वास्को (न. प्र.)ः वादळी वार्याच्या तडाख्यासह धुवांधार पावसाने वास्को शहराला गुरुवारी व कालही झोडपून काढले. वादळी वारा व पावसामुळे वास्कोत अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. घरांवर, वाहनांवर झाडे उन्मळून पडण्याच्या अनेक घटना घडल्या. नागरिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. वास्को अग्निशमन दलाला गुरुवारपासून तारेवरची कसरत करावी लागली. गुरुवारी व काल दुपारपर्यंत चाळीसहून अधिक कॉल्स केल्याचे वास्को अग्निशामन दलाकडून माहिती प्राप्त झाली आहे. गुरुवारी संध्याकाळपासून वीज गायब झाली होती. मांगोरहील, सासमोळे, बायणा येथे घरांवर झाडे उन्मळून पडल्याने घर मालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. सडा येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाजवळ एका वाहनावर झाड कोसळून वाहनांचे नुकसान झाले. तसेच बायणा पोलीस आऊट पोस्ट, पै नर्सिंग होम मांगोरहील, दाबोळी, सांकवाळ आदी ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली.
दरम्यान, काल सकाळी मुरगाव नगरपालिकेसमोरील श्री साईबाबा मंदिराजवळील दोन भले मोठे वृक्ष मुळापासून उन्मळून पडल्याने दोन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर दोन अन्य चारचाकी वाहनांनाही नुकसानीला सामोरे जावे लागले. वाहनांवर वृक्ष पडून वाहनांचा चेंदामेंदा झाला. वास्को अग्निशमन दलाला हे भले मोठे वृक्ष मोकळे करण्यासाठी सहा तास लागले.
दरम्यान, अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बोगमाळो बीचवर असलेल्या बार ऍण्ड रेस्टॉरंट पर्यंत पाणी पोचल्याने रेस्टॉरंट मालकांची बरीच तारांबळ उडाली.