चक्क संसदेत आढळले नोटांचे बंडल

0
5

काँग्रेस खासदाराच्या आसनाखाली सापडले 50 हजार रुपये

काल चक्क देशाच्या संसद भवनातील एका खासदार महोदयांच्या आसनाखाली नोटांचे बंडल (50 हजार रुपये) आढळून आल्याने संसदेत चांगलाच गदारोळ माजला. काँग्रेस खासदाराच्या आसनाखाली हे नोटांचे बंडल सापडल्याने सत्ताधारी पक्षाने जोरदार हल्लाबोल केला.

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून राज्यसभा सभागृहात काल एका खासदार महोदयांच्या जागेवरील आसनाखाली नोटांचे बंडल आढळून आल्याने सारेच अवाक्‌‍ झाले. त्यानंतर, सभागृहात खासदारांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांनी सभागृहाला माहिती दिली.मला मिळालेल्या माहितीनुसार एका रुटीन अँटी सेबाटोज तपासादरम्यान गुरुवारी सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सभागृहातूनच नोटांचे बंडल ताब्यात घेण्यात आले. 50 हजार रुपये एवढी रक्कम असलेले 500 रुपयांच्या नोटांचे बंडल सभागृहातील नंबर 222 च्या आसनाखाली आढळून आल्याची माहिती त्यांनी
दिली.

याच मुद्द्यावरुन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे सभागृहात बोलण्यासाठी उठले असता सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे, खर्गे यांनी संताप व्यक्त करत भाजप खासदारांना चांगलेच सुनावले. ‘असे चिल्लर काम करुन तुम्ही देशाला बदनाम करत आहात, असे खर्गे म्हणाले.

तपास होण्यापूर्वी नाव
जाहीर करणे चुकीचे : खर्गे

या घटनेचा संपूर्ण तपास होईपर्यंत ज्या खासदाराच्या आसनाखाली नोटांचे बंडल सापडले, त्यांचे नाव जाहीर करणे चुकीचे आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. दुसऱ्या बाजूला ही घटना अतिशय गंभीर असल्याचे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाण्याचे काम या घटनेने होऊ शकते, असेही नड्डा यांनी म्हटले आहे.