चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

0
7

>> अभिनेता पवन कल्याण यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; 24 मंत्री शपथबद्ध

तेलगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी चौथ्यांदा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायडू यांच्यानंतर जनसेना पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह 24 मंत्री आहेत. टीडीपीचे 20, पवन कल्याणसह जनसेनेचे 3 आणि भाजपचा एक मंत्री आहे. एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र आणि टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांनाही मंत्री करण्यात आले आहे. याशिवाय टीडीपी आंध्रप्रदेशचे अध्यक्ष के. अचन्नायडू आणि जनसेना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष नदेंदला मनोहर हेही मंत्रिमंडळात आहेत. टीडीपीच्या मंत्र्यांमध्ये 17 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. जनसेना पक्षाचे पवन कल्याण, नदेंदला मनोहर आणि कंदुला दुर्गेश हे तीन मंत्री आहेत, तर सत्यकुमार यादव हे भाजपच्या कोट्यातील एकमेव मंत्री आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात तीन महिला आहेत. एन. मोहम्मद फारुख यांच्या रूपाने एका मुस्लिम चेहऱ्याचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.