‘सरळवास्तू’ च्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची कर्नाटकच्या हुबळीतील एका हॉटेलमध्ये काल दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर हे हॉटेलमध्ये कोणालातरी भेटायला गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी त्यांच्या खासगी कामासाठी हुबळीला आले होते. दुपारी १२ च्या सुमारास चंद्रशेखर यांची हत्या करण्यात आली. दोन व्यक्ती अनुयायी बनून त्यांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांनी चंद्रशेखर यांच्यावर हल्ला केला. चंद्रशेखर यांच्यावर हल्ला होत असलेला पाहून हॉटेलमधील काही कर्मचार्यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. हल्ला केल्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. वास्तूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर आधी कंत्राटदार म्हणून काम करायचे. मग चंद्रशेखर यांनी वास्तूचे काम सुरू केले.