>> मतपत्रिका आणि मतमोजणीचा सगळा व्हिडिओ देखील सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
चंदीगड महापौर निवडणूक चांगलीच वादात सापडली आहे. महापौरपदी भाजपचा उमेदवार निवडून यावा, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेले गैरप्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढताना ही लोकशाहीची हत्या असल्याचे 5 फेब्रुवारीला म्हटले होते. त्यानंतर काल पुन्हा एकदा या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला फटकारले. चंदीगड महापौर निवडणुकीत झालेला घोडेबाजार गंभीर आहे. त्यामुळे या निवडणुकीतील मतपत्रिका आम्हाला पाहायच्या आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मतपत्रिका सादर करण्यासाठी मंगळवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंतची मुदत न्यायालयाने दिली आहे.
काल या प्रकरणात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या पीठाने सुनावणी घेतली. पीठासीन अधिकारी अनिल मसीह यांनी हे मान्य केले आहे की त्यांनी चंदीगड महापौर निवडणुकीत मतपत्रिकेशी छेडछाड केली. आता मसीह यांनी हजर व्हावे आणि त्या मतपत्रिका घेऊन याव्यात, असे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड म्हणाले. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी मंगळवारी दुपारी दोन वाजता सुनावणी करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालाकडे मतपत्रिकांची मागणी केली आहे. इतकेच नाही तर मतमोजणीचा सगळा व्हिडिओ सादर करा, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
या प्रकरणात जर मसीह दोषी ठरले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात मसीह यांना न्यायालयाने विचारले की तुम्ही मतपत्रिकांवर खुणा केल्या होत्या का? त्यावर त्यांनी होय मी आठ मतपत्रिकांवर इंग्रजी ‘एक्स’ अक्षराच्या खुणा केल्या होत्या, असे सांगितले. तुम्हाला फक्त सही करायची होती तुम्ही कुठल्या अधिकाराने ही खूण आठ मतपत्रिकांवर केली? असा सवाल न्यायालयाने विचारला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात काल होणाऱ्या सुनावणीच्या एक दिवस आधी रविवारी भाजप नेते मनोज सोनकर यांनी चंदीगडच्या महापौरपदाचा राजीनामा दिला.