घोडेबाजार नको

0
47

गोवा विधानसभेच्या चाळीस जागांसाठी काल गोमंतकीय मतदारांनी नेहमीप्रमाणेच भरघोस मतदान करून आपली राजकीय जागरूकता पुन्हा एकवार दाखवून दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि राज्यातील एकूण राजकीय साठमारीमुळे आलेला निरुत्साह या दोन्ही गोष्टी बाजूला सारून आणि जोडून तीन दिवस सुटी आलेली असतानाही बाहेरगावी न जाता मतदारांंनी आपला मताधिकार व्यवस्थित बजावला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानकेंद्रांची संख्या अधिक असूनदेखील काल भल्या सकाळपासूनच बहुतेक मतदारसंघांतील मतदानकेंद्रांवर रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या आणि दुपारनंतरही मतदारांचा हा जोश कायम होता. मतदान मोठ्या प्रमाणात होणे याचाच अर्थ गोमंतकीय मतदार लोकशाहीने बहाल केलेल्या आपल्या कर्तव्याप्रती जागरूक आहे असा होतो. परंतु त्याची राजकीय समज किती आहे आणि योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याइतपत त्याला परिपक्वता आहे का हे येत्या १० मार्च रोजी कळणार आहे.
आजवरच्या निवडणुकांपेक्षा यावेळची ही विधानसभा निवडणूक बरीच वेगळी होती हे तर वारंवार नमूद केले गेले आहेच. बहुतेक मतदारसंघांमध्ये यावेळी बहुरंगी लढती झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपा एकीकडे आणि विरोधकांची विखुरलेली ताकद दुसरीकडे असा हा एकंदर सामना आहे. भाजपातून ठिकठिकाणी झालेली बंडखोरी, सरकारच्या कामगिरीप्रतीचे असमाधान एका बाजूला आणि राज्यात बाहेरून आलेल्या नवनव्या राजकीय पक्षांच्या गलबल्यामुळे आणि त्यांच्यात पुन्हा एकवाक्यता नसल्याने मतदारांत उडालेला गोंधळ दुसर्‍याबाजूला असेच चित्र या निवडणुकीत सर्वसाधारणपणे पाहायला मिळाले. गोव्यात या निवडणुकीत उतरलेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची त्यामागील नेमकी उद्दिष्टे काय याचीच शंका यावी अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेल्या पाहायला मिळाल्या. कॉंग्रेस पक्षाने आपला स्वबळाचा हेका शेवटपर्यंत सोडला नाही. केवळ दिगंबर कामत यांच्या मध्यस्थीमुळे गोवा फॉरवर्डचा युतीचा टिळा त्यांनी लावून घेतला असला तरी भाजपला सत्तेवरून खाली उतरवण्याची भाषा करणार्‍या बाकी सर्व पक्षांना त्यांनी आपल्यापासून कटाक्षाने दूर ठेवले. आपले आजवरचे सर्व बाहुबली उमेदवार बघता बघता पक्ष सोडून गेल्याने बहुतेक सर्व नवखे उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची पाळी कॉंग्रेसवर आली. तृणमूल कॉंग्रेसचे एकूण लक्ष्यही भाजपापेक्षा कॉंग्रेसच अधिक असल्याचे सतत दिसत राहिले. मगो पक्षाने आपल्या विचारधारेशी सुतराम संबंध नसलेल्या तृणमूल कॉंग्रेसशी यावेळी गाठ बांधली. आम आदमी पक्षाने यावेळी सुरवातीपासूनच आपला ‘एकला चलो रे’ चा मार्ग अवलंबिला. दिल्लीप्रमाणे गोव्यातही राजकीय चमत्कार घडवण्याचे स्वप्न तो पक्ष पाहात आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, आरजीपासून जय महाभारत पक्षापर्यंत अनेक पक्ष आणि त्याहून अधिक अपक्ष उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. खुद्द सत्ताधारी भाजपापासून दुरावलेले अनेकजण अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेले आहेत.
या निवडणुकीत उतरलेल्या राजकीय पक्षांचे आणि अपक्षांचे मोठे प्रमाण पाहिले तर निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार की त्रिशंकु स्थिती निर्माण होणार ही खरी चिंता आज गोमंतकीय मतदाराला सतावते आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल कॉंग्रेसच्या बाजूने गेला होता, परंतु भाजपाने रातोरात सर्जिकल स्ट्राईक करून सरकार घडवले होते आणि त्याला स्थैर्य देण्यासाठी पुन्हा दोन सर्जिकल स्ट्राईकही केले होते. त्रिशंकू स्थिती उद्भवली तर गेल्यावेळच्या चुका यावेळी होणार नाहीत असे कॉंग्रेस नेते सांगत आहेत. सत्ताधारी भाजपाला स्वबळावर २२ जागा जिंकण्याचा विश्वास आहे. प्रश्न एकच आहे. समजा त्रिशंकु स्थिती उद्भवली, तर या निवडणुकीपूर्वीची आपली भूमिका एका रात्रीत सोडून देऊन सरकार बनवणार्‍या पक्षामध्ये तर निर्वाचित उमेदवार उडी घेणार नाहीत ना? ‘मतदारसंघाचा विकास’, ‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षा’ अशी कारणे मग असे स्वार्थी आमदार आपल्या भूमिका बदलताना मग पुढे करीत असतात. गेल्या निवडणुकीत तर आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच पक्षत्याग करून सत्तेच्या गोटात शिरण्याचा प्रकार झाला होता. यावेळी पक्षांतर करणार नाही अशा शपथा काय घेतल्या गेल्या आहेत, प्रतिज्ञापत्रे काय भरली गेली आहेत; प्रत्यक्षात ही मंडळी निवडून आल्यास कशी वागते ते मतदार पाहणारच आहे. घोडेबाजार घडण्यास पूरक अशी राजकीय अनिश्‍चिततेची परिस्थिती या निवडणुकीनंतर निर्माण होणार नाही, तत्त्वशून्य तडजोडींना रान मोकळे होणार नाही, एक स्वच्छ, पारदर्शक व प्रामाणिक सरकार सत्तेवर येईल अशी भाबडी अपेक्षा करूया.