घुसखोरीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे ‘बीएसएफ’कडे बोट

0
2

>> केंद्र सरकारवरही केले गंभीर आरोप; बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे पश्चिम बंगालमध्ये अशांतता

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत करत आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये अशांतता पसरली आहे. हा सर्व केंद्र सरकारचा अजेंडा आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी केला. राज्य अस्थिर करण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना बीएसएफ मदत आहे. अवैध घुसखोरांना राज्यात घुसवले जात असून, त्याचा ठपका मात्र तृणमूल काँग्रेसवर ठेवला जात आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपांवर बीएसएफ किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केंद्र सरकार आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) वर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, केंद्र सरकारच्या षड्‌‍यंत्राचा भाग म्हणून बीएसएफ बांगलादेशी दहशतवाद्यांना बंगालमध्ये शिरकाव करण्याची परवानगी देत आहे, ज्यामुळे अस्थिरता निर्माण झाली आहे.

बीएसफ विविध भागांमधून बंगालमध्ये घुसखोरी होऊ देत आहे आणि महिलांना त्रास दिला जात आहे. सीमा आमच्या नियंत्रणात नाही. त्यामुळे जर कोणी टीएमसीवर घुसखोरीचा आरोप करत असेल तर मी स्पष्ट करते की ही जबाबदारी बीएसएफची आहे. टीएमसीला दोष देऊ नये. तसेच त्यांनी बीएसएफ घुसखोरांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करत आहे. याचा उद्देश पश्चिम बंगाल अस्थिर करणे आहे, असा आरोपही बॅनर्जी यांनी यावेळी केला.
सीमा सुरक्षा दल घुसखोरांना कथितपणे कुठे मदत करत आहे याची चौकशी करण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी बीएसएफचे डीजी राजीव कुमार यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बांगलादेशातून होणारी घुसखोरी पश्चिम बंगालमधील शांतता भंग करत असल्याचा आरोप केला होता. बांग्लादेश आणि भारत यांच्यामध्ये 4096 किलोमीटर लांबीची सीमा आहे. ज्याचा मोठा भाग नद्या आणि जंगलांमुळे संवेदनशील आहे. या भागात घुसखोरीच्या घटना वारंवार होत असतात.