>> बाबू ब्रदर्स टी-२० क्रिकेट
उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात घुमटेश्वर वॉरियर्सने फातोर्डा फॉरवर्डचा ४ धावांनी पराभव करत आठव्या बाबू ब्रदर्स अखिल गोवा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बाबू ब्रदर्स स्पोटर्स असोसिएशनने फातोर्डा येथील साग सराव मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते.
अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना घुमटेश्वरने २० षटकांत ८ बाद १४४ धावा फलकावर लगावल्या. त्यांच्या विकास देसाईने सर्वाधिक ३७ धावांचे योगदान दिले. फातोर्डाकडून सुयश प्रभुदेसाईने ३७ धावांत पाच गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फातोर्डा संघ २० षटकांत ९ बाद १४० धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून आदित्य आंगलेेने एकाकी झुंज देत ४४ धावा जमवल्या. घुमटेश्वर वॉरियर्सने विजेतेपदासह १ लाख रुपयांची कमाई केली. फातोर्डा संघाला ५० हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी बाबू ब्रदर्स स्पोटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशेंद्र नाईक व सुशांत शिरोडकर उपस्थित होते. स्पर्धावीर ठरलेल्या सुयश प्रभुदेसाई याला बक्षीस म्हणून दुचाकी देण्यात आली.
संक्षिप्त धावफलक ः घुमटेश्वर वॉरियर्स २० षटकांत ८ बाद १४४ (विकास देसाई ३७, धीरज नार्वेकर ३१, विश्वजित फडते २६, सुयश प्रभुदेसाई ३७-५, सोमेश प्रभुदेसाई १७-१, वेदांत नाईक १५-१) वि. वि. फातोर्डा फॉरवर्ड २० षटकांत ९ बाद १४० (आदित्य आंगले ४४, साईश कामत २०, शिवप्रसाद पुरोहित २०, महेश भाईडकर, बसवराज मदार, हरिष नाईक व अमूल्य पांड्रेकर प्रत्येकी २ बळी)