घाव मुळावर हवा

0
22

काश्मीरमधील दहशतवादावर सुरक्षा यंत्रणांनी आपले मजबूत नियंत्रण मिळवल्यापासून दहशतवाद्यांनी आपला मोर्चा पीर पंजाल पर्वतराजीच्या दक्षिणेस म्हणजे जम्मू विभागात वळवलेला गेल्या काही घटनांतून दिसून आले आहे. रियासीमध्ये शिवखोडी गुंफा पाहून वैष्णोदेवीच्या दर्शनास निघालेल्या निरपराध भाविकांवर झालेला भीषण हल्ला, पाठोपाठ कठुआ आणि दोडा जिल्ह्यांत सुरक्षा दलांवर झालेले हल्ले हे सगळे पाहिले तर दहशतवाद्यांनी जम्मू विभागात डोके वर काढलेले स्पष्ट दिसते. नव्याने सत्ता हाती घेतलेल्या पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि सर्व सुरक्षा यंत्रणांना दहशतवादविरोधी यंत्रणा पूर्ण क्षमतेने राबवण्याचे निर्देश दिले. त्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेऊन सुरक्षा यंत्रणांना दिशानिर्देश दिले आहेत. काहीही करून जम्मू विभागातील ह्या घातपाती कारवायांनाही रोखायला हवे हा निर्धार केंद्र सरकारने केलेला दिसतो. अर्थात, काश्मीर खोऱ्याच्या तुलनेत जम्मू विभागातील ह्या घातपाती कारवाया रोखणे अधिक आव्हानात्मक आहे. पाकिस्तानातून घुसखोरीच्या नव्या वाटा दहशतवाद्यांनी अवलंबिलेल्या आहेत. त्यासाठी भुयारे खोदण्यापासून द्रोनचा वापर करण्यापर्यंत आणि आम नागरिकाप्रमाणे भारतात प्रवेश करून नंतर स्थानिक पाठिराख्यांकडून शस्त्रास्त्रे मिळवण्यापर्यंत अनेक गोष्टी नव्याने समोर आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यास थोडा वेळ लागू शकतो. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवला गेल्यापासून अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानस्थित शक्तींचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काश्मीर खोऱ्यातही हिरीरीने झालेले मतदान पाहून तीळपापड उडाला असेल तर नवल नाही. जम्मू प्रदेश डोंगराळ आहे आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. त्याचा फायदाही दहशतवादी उठवीत आहेत असे दिसते. कठुआमध्ये झालेल्या चकमकीत जे दोन दहशतवादी मारले गेले त्यांच्यापाशी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, सॅटलाईट फोन आणि पाकिस्तानमध्ये उत्पादित खाद्यपदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या. म्हणजेच ह्या दहशतवाद्यांची पाठवणी पाकिस्तानातून केली गेली आहे. तेथील लाँचपॅडवर सत्तर ते ऐंशी दहशतवादी असल्याची माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यांच्या येथील पाठीराख्यांविरुद्ध ज्या प्रकारे काश्मीर खोऱ्यात जबरदस्त मोहीम हाती घेऊन त्यांचा बीमोड करण्यात आला, त्याच प्रकारे मोहीम आता जम्मूमध्ये सुरू झाली आहे. दहशतवाद्यांशी धागेदोरे आढळलेल्यांच्या मालमत्ता जप्त करण्यापासून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यापर्यंत उपाययोजनांना प्रारंभ झाला आहे. लागोपाठ झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना न घाबरता काश्मिरी पंडितांनी नुकत्याच झालेल्या खीरभवानीच्या यात्रेमध्ये उत्साही सहभाग दर्शवला. तब्बल 176 बसगाड्यांमधून ह्या भाविकांनी खोऱ्यातील खीरभवानी, त्रिपुरासुंदरी आदींच्या पाच प्रसिद्ध मंदिरांना भेटी दिल्या आणि दहशतवादाच्या जोरावर तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही असा खणखणीत संदेशही दिला. ‘किती दिवस भिऊन काढायचे? आम्ही घाबरत नाही आम्हाला आमच्या देवीचे संरक्षण आहे’ असे ठणकावणाऱ्या ह्या भाविकांच्या धैर्याचे कौतुक करायचे तेवढे थोडे आहे. खीरभवानी यात्रेपाठोपाठ आता अमरनाथ यात्रा येणार आहे. 29 जून ते 19 ऑगस्ट अशी दोन महिने ही यात्रा चालणार आहे. त्यामुळे ह्या यात्रेत खो घालण्याचा आटापिटा दहशतवादी शक्ती करतील, परंतु त्यांना भीक न घालता देशभरातून भाविक अमरनाथ यात्रेला ह्यावर्षीही हजेरी लावतील ह्यात शंका नाही. हे दहशतवादी हल्ले भाविकांना घाबरवू तर शकलेले नाहीतच, उलट आव्हान म्हणून यात्रेला निघण्यास प्रेरित करीत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याचाही विचार करीत आहे, त्यामुळेही पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचे म्होरके अस्वस्थ झाले आहेत. काहीही करून हे होऊ द्यायचे नाही म्हणून सशस्त्र दहशतवाद्यांची पाठवणी चालली आहे. रक्ताचे सडे पाडले जात आहेत. परंतु आता काश्मिरी जनताही ह्या दहशतवादाला उबगली आहे. खोऱ्यात आलेल्या बदलाने बहुसंख्य काश्मिरी सुखावले आहेत. आपले रोजचे जगणे भीतीच्या छायेत राहिलेले नाही हे त्यांना दिलासादायक वाटू लागले आहे. श्रीनगरच्या जामा मशिदीचा प्रमुख आणि हुर्रियतच्या मवाळ गटाचा नेता मीरवाईज उमर फारूखने काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत यायचे आवाहन जामा मशिदीच्या मंचावरूनच केले आहे. बदल घडतो आहे आणि दहशतवाद्यांना तो रोखायचा आहे. परंतु त्यांना थोपवायचे असेल तर त्यांचे मूळ जे पाकिस्तान त्याचे नाक दाबणे अधिक आवश्यक आहे. घाव मुळावर हवा, तरच तो प्रभावी ठरेल.