घराची भिंत कोसळून मुलगा ठार; वडील जखमी

0
8

ताळसाणझर, फातोर्डा येथे काल सकाळी साडेसातच्या सुमारास घराचे छप्पर व भिंत कोसळून 18 वर्षीय मुलगा ठार झाला, तर त्याचे वडील जखमी झाले. अन्य एका घटनेत खारेबांध-पेडा, बाणावली येथे घर कोसळून 93 वर्षांची वृद्ध महिला जखमी झाली.

सविस्तर माहितीनुसार, ताळसाणझर येथील कोमुनिदादच्या जागेत डोंगरावर अनेक बेकायदा घरे बांधण्यात आली आहेत. त्यातीलच एका घरात पिता-पुत्र भाड्याने राहत होते. ते दोघेही मूळ उत्तरप्रदेशातील असून, मडगाव येथे मजूर म्हणून काम करत होते. जोरदार पावसामुळे कमकुवत झालेली घराची भिंत काल सकाळी अचानक कोसळून कार्तिक चौहान (18) हा जागीच ठार झाला. त्याच्या अंगावर भिंत पडल्याने तो जागीच गतप्राण झाला. या घटनेत त्याचे वडील द्विग्विजय चौहान हे जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. याच भागात आणखी कित्येक घरे मोडकळीस आलेली आहेत. त्यामुळे भविष्यात आणखी दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही. त्या घरात वडील व पुत्र दोघे राहात आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे सासष्टी तालुक्यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. कित्येक ठिकाणी घरे व अन्य मालमत्तांवर झाडे पडून नुकसान झाले. तसेच सखल भागातील काही घरांमध्ये पुराचे पाणी घुसले.

कोंब मडगाव येथे 8 घरांत पाणी
कोंब-मडगाव येथे काल पुराचे पाणी 8 घरांत घुसले. धोकादायक स्थिती असल्याने काही घरातील लोक इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. हा सखल भाग आहे. मलनिःसारण वाहिन्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याने चेंबरमधून सांडपाणी भरून सर्वत्र पसरले व त्यात पावसाचे पाणी मिसळल्याने पाण्याची पातळी वाढली. पश्चिम बगलरस्त्याच्या बांधकामामुळे पुराचे पाणी मुंगूल, माडेल, सुरावली तसेच पेडा येथपर्यंत शिरले.