घराची भिंत कोसळून माय-लेकाचा मृत्यू

0
10

>> नेवरा-मंडूर येथील घटना; पडझड व दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच; पावसाची थोडीशी उसंत; पण राज्यात पूरस्थिती कायम

जोरदार पावसाने रविवारी राज्याला झोडपून काढल्यानंतर काल पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला. असे असले तरी पूरस्थिती आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटनांचे सत्र सुरुच आहे. सोमवारी दुपारी नेवरा-मंडूर (तिसवाडी) येथील ग्रामपंचायतीजवळील एका जुन्या घराची भिंत जोरदार पावसामुळे कमकुवत होऊन कोसळल्याने आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात चोवीस तासांत 9.25 इंच पावसाची नोंद झाली असून, पणजीमध्ये विक्रमी 14.20 इंच पावसाची नोंद झाली. रविवारच्या जोरदार पावसानंतर सोमवारी पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले होते, तरीही राजधानी पणजीसह विविध भागांत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्यात आत्तापर्यंत एकूण 57.70 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण सुमारे 23.2 टक्के अधिक नोंद झाले आहे.

मिरयाभाट, नेवरा येथील ग्रामपंचायतीजवळील एका जुन्या घराची मातीची भिंत कोसळल्याने मारिया रॉड्रिगीस (70 वर्षे) आणि आल्फ्रेड रॉड्रिगीस (51 वर्षे) या आई आणि मुलाचे जागीच निधन झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. घराची कोसळलेल्या मातीच्या भिंतीखाली आई आणि मुलगा सापडल्याने त्यांचे जागीच निधन झाले. अग्निशामक दलाच्या जवांनानी ढिगाऱ्याखालील मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी आगशी पोलीस तपास करीत आहेत.
गेल्या चोवीस तासांत पणजी येथे सर्वाधिक 14.20 इंच पावसाची नोंद झाली. राजधानी पणजीतील 18 जून रस्ता, कांपाल, मिरामार, करंजाळे, मेरशी आणि इतर भागांत पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. कांपाल, मिरामार भागातील रस्त्यांवर पाणी साचून राहिल्याने नागरिकांना घरांच्या बाहेर पडण्यास सोमवारी सकाळी अडचण निर्माण झाली होती. सेंट मेरी कॉलनी कांपाल भागात साचलेले पाणी सोमवारी दुपारपर्यंत ओसरले नव्हते. घरे आणि इमारतींच्या परिसरात पाणी घुसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मेरशी येथे मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची साचलेल्या पाण्यातून वाहने चालवताना तारांबळ उडाली.

पडझडीच्या 122 घटना
राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या 122 घटना आणि दरड कोसळण्याच्या 6 घटनांची नोंद झाली. राज्यभरात पाणी साचण्याच्या 13 घटनांची नोंद झाली. झाडांच्या पडझडीच्या घटनांमध्ये सुमारे 19 लाख 44 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आतापर्यंत किती पडला पाऊस
राज्यात 1 जून ते आत्तापर्यंत वाळपई येथे सर्वाधिक 71.05 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे 68.40 इंच, साखळी येथे 65.53 इंच, काणकोण येथे 60.23 इंच, फोंडा येथे 59.57 इंच, मडगाव येथे 58.14 इंच, केपे येथे 57.20 इंच, म्हापसा येथे 55.64 इंच, पेडणे येथे 52.87 इंच, पणजी येथे 52.86 इंच, जुने गोवे येथे 52.68 इंच, मुरगाव येथे 49.42 इंच आणि दाबोळी येथे 46.63 इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील 3 धरणे तुडुंब
राज्यातील साळावलीसह पंचवाडी आणि गावणे ही तीन धरणे 100 टक्के भरली असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. डिचोली तालुक्यातील आमठणे धरणामध्ये 67 टक्के, तर चापोली धरणामध्ये 77 टक्के पाण्याचा साठा झाला आहे. सत्तरी तालुक्यात जोरदार पावसाची नोंद झाली असली तरी अंजुणे धरणातील पाण्याची पातळी 57 टक्के एवढीच आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये
किती इंच पडला पाऊस

शहर : पाऊस (इंचात)
पणजी 14.20
जुने गोवे 13.14
म्हापसा 11.70
पेडणे 9.64
साखळी 9.61
वाळपई 9.18
सांगे 8.71
मडगाव 8.34
दाबोळी 8.19
मुुरगाव 8.12
काणकोण 7.50
फोंडा 7.48
केपे 6.88

पणजीत एक-दोन ठिकाणीच पूर : मुख्यमंत्री

राजधानी पणजी शहरात केवळ एक-दोन ठिकाणीच रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याचा दावा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. पणजीतील सखल भाग असलेल्या दोन ठिकाणी पावसामुळे पूर आल्याची माहिती आपणाला उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्मार्ट सिटीचे काम होण्यापूर्वी जसा पणजीत पूर यायचा, तसाच आताही येत असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केलेला असला, तरी तो खरा नसल्याचे सांगून आपण रविवारच्या पावसाचा आढावा घेतल्यानंतर शहरातील सखल भाग असलेल्या केवळ दोन ठिकाणीच पूर आल्याची माहिती आपणाला मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आपत्ती व्यवस्थापन पथक अथकपणे काम करीत असून, ज्या ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे तेथून ते पंपिंग करून बाहेर फेकण्याचे काम जलसंसाधन खात्याने हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील विविध भागांत पुरात सापडलेल्या लोकांना अन्य काही लोकांनी आपले प्राण धोक्यात घालून वाचवण्याचे काम केले असल्याची माहिती आपणाला मिळाली असून, त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.