>> आगामी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा निर्णय; नवे दर आजपासून होणार लागू
या वर्षाच्या अखेरपर्यंत 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल मोदी सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली. हा निर्णय बुधवारपासून लागू होणार असून, काल केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली. ओणम सण आणि राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मोदी सरकारने देशभरातील महिलांना गिफ्ट दिल्याचा दावा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे; मात्र गेल्या वर्षी गोवा, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांवेळी दिलेले तीन मोफत सिलिंडरचे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाही. त्यामुळे महागाईच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकांत फटका बसू शकतो, हे गृहीत धरून मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही गोव्यासह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात केली होती.
मार्च 2023 मध्ये 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सध्याच्या घडीला मुंबईत 14 किलोच्या अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 1002.50 रुपये आहे, तर दिल्लीत त्याची किंमत सुमारे 1003 रुपये एवढी आहे. मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 1102 रुपये, तर दिल्लीत त्याची किंमत 1103 रुपये आहेत. आता अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेता सिलिंडर आणि इंधनाच्या किमती कमी करण्याचा दबाव मोदी सरकारवर होता. त्यामुळे तूर्त आता सरकारने सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.
मिझोरम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाणा या राज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुका जाहीर होऊ शकतात. मिझोरमच्या विधानसभेचा कार्यकाळ 17 डिसेंबरला संपणार आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे 3 जानेवारी 2024 आणि 6 जानेवारी 2024 ला संपणार आहे. राजस्थान आणि तेलंगाणा राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे 14 आणि 16 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले…
200 रुपये कपातीचा देशातील 33 कोटी ग्राहकांना लाभ मिळेल.
या निर्णयामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारवर 7,680 कोटींचा बोजा पडेल.
उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी 200 रुपये अनुदान होते, तर बुधवारपासून त्यावर 200 रुपयांच्या अतिरिक्त अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
याचबरोबर उज्ज्वला योजनेंतर्गत 75 लाख महिलांना नवीन मोफत कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी त्यांना 1 रुपयाही द्यावा
लागणार नाही. पाईप, स्टोव्ह आणि सिलिंडरही मोफत मिळेल.
उज्ज्वला योजनेच्या सिलिंडरसाठी केंद्र सरकार प्रत्येक जोडणीसाठी 3600 रुपये खर्च करत असून, आतापर्यंत 9.60 लाख महिलांना उज्ज्वला सिलिंडरचा लाभ देण्यात आला आहे.
गोव्यात नवे दर किती असणार?
गोव्यात सध्याच्या घडीला 1100 ते 1150 रुपयांच्या आसपास घरगुती गॅस सिलिंडर मिळतो. वाहतूक भाड्यानुसार या दरात किंचित फरक पडतो. बुधवारपासून हा निर्णय लागू झाल्यानंतर घरगुती गॅस सिलिंडर 900 ते 950 रुपयांपर्यंत मिळू शकतो.
पेट्रोल-डिझेलच्या दरातही दिलासा?
आगामी निवडणुकांच्या तोंडावर सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा देण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चांगली कमाई केली असून, कोरोनाच्या काळात झालेले नुकसान आता भरून निघाले आहे.