मध्य चीनमधील आर्थिक, शैक्षणिक केंद्र मानल्या जाणार्या वुहान शहरात आढळलेल्या कोरोना विषाणूने सध्या जगाची झोप उडवली आहे. गोव्यातही या विषाणूचा एक संशयित रुग्ण आढळल्याने हे लोण येथवर तर आलेले नाही ना या चिंतेने गोमंतकीयही ग्रासले गेले आहेत, परंतु या आधीच्या बर्ड फ्लू किंवा सार्सप्रमाणे या विषाणूबाबत नाहक भीतीचे वातावरण पसरवले जाणार नाही आणि सोशल मीडियाचा त्यासाठी दुरुपयोग होणार नाही याकडे सरकारने कटाक्षाने लक्ष पुरवणे आवश्यक आहे. या कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे सर्वसामान्य सर्दीसारखीच आहेत, त्यामुळे त्याचे योग्य निदान करणे जिकिरीचे आहे ही यातली सर्वांत चिंताजनक बाब आहे. यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे नवे विषाणू आढळले होते, तेव्हा त्यांची लक्षणे देखील सामान्य सर्दी तापासारखीच असतात असेच दिसून आलेले होते. परिणामी गोव्यात विदेशातून परतलेल्या एका साध्या सर्दी पडशाच्या रुग्णाला ‘सार्स’चा रुग्ण घोषित करून गोमेकॉमध्ये त्याला ज्या स्थितीत ठेवले गेले होते, तो प्रकार जनतेमध्ये भीती निर्माण करून गेला होता. एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे कोरोना हा एक विषाणू नाही. ते एक विषाणूंचे कूळ आहे. त्यात दोनशेहून अधिक विषाणूंचा समावेश होतो. सध्या आढळलेला विषाणू हा त्यातील एक नवा विषाणू आहे. ‘सार्स’ चा उगमही त्याच जातकुळीच्या विषाणूपासून झाला होता. असे विषाणू आढळतात तेव्हा त्यांच्यावर औषधे, लसी शोधल्या जातात, परंतु त्यामुळे अनेकदा हे विषाणू स्वतःमध्ये जनूकबदल करून घेत असतात, ज्यामुळे आधीची औषधे यांच्यावर चालेनाशी होतात. कोरोना विषाणू संदर्भात सध्या नाना तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. कोणाला वाटते की चीन जैविक अस्त्रे तयार करीत आहे, त्यातूनच हा विषाणू पसरला, तर कोणी याचा संबंध एका फार्मा कंपनीने घेतलेल्या पेटंटशी लावला आहे. त्याच्या जनुकीय रचनेचे साधर्म्य पाहता तो सापांपासून किंवा वटवाघळापासून आला असल्याचे निष्कर्ष काढले गेले आहेत. चीन हा पोलादी पडद्याआडचा देश असल्याने या विषाणूच्या संसर्गासंदर्भात त्याने या विषाणू संदर्भात बराच काळ लपवाछपवी चालवल्याचाही आरोप आहे. कोरोना विषाणूचा उगम जरी दूर चीनमध्ये झालेला असला, तरी आज जागतिकीकरणाच्या जमान्यामध्ये चीन म्हणजे काही फार दूर नाही. कित्येक गोमंतकीय व्यापारी चीनमध्ये नियमितपणे जाऊन तेथे स्वस्तात मिळणारे तयार कपडे व अन्य उत्पादने गोव्यात आणून विक्री करीत असतात. त्या निमित्ताने त्यांचे वर्षातून अनेकवेळा तेथे जाणे होते. कित्येक भारतीय स्वस्तातील फर्निचर व इतर उत्पादनांच्या खरेदीसाठी थेट चीनमध्ये जाणे पसंत करतात. शिवाय चीनमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांचे प्रमाणही काही कमी नाही. त्यामुळे ज्या प्रकारे हा विषाणू अन्य खंडांमध्ये व देशांमध्ये झपाट्याने पसरल्याचे दिसून आले, तशाच प्रकारे तो भारतात येणेही फारसे कठीण म्हणता येणार नाही. त्यामुळे गरज आहे ती अशा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांची. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वेगळा विभाग सुरू केला हे उचितच झाले, परंतु पूर्णपणे खात्री झाल्याविना कोणालाही थेट कोरोना विषाणूबाधित ठरवणे योग्य होणार नाही. संशयित आणि प्रत्यक्षातील रुग्ण यामधील फरक जनतेनेही समजून घेतला पाहिजे. जेव्हा एखादा नवा विषाणू नजरेस येतो, तेव्हा त्यावरील औषधाच्या निर्मितीसाठी जो वेळ लागतो, तोवर त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत आणि योग्य उपचारांचा असलेला अभाव यामुळे माणसे मृत्युमुखी पडू शकतात. कोरोना विषाणूच्या संदर्भातही सध्या हेच घडले आहे. चीनमध्ये १३० हून अधिक लोक या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले आहेत. तरी चीनने तात्काळ पावले उचलत पाच दिवसांच्या आत या विषाणूसंदर्भातील सर्व उपलब्ध वैद्यकीय तपशील अन्य राष्ट्रांना दिला आणि त्यावर औषध निर्मितीसाठी जगाला हाक दिली. येत्या काही दिवसांत त्यावर प्रभावी ठरेल असे औषध निश्चितपणे विकसित होईल, परंतु किमान तोवर या विषाणूचा प्रसार कसा रोखता येईल यावर खबरदारी जशी चीनने घेतली आहे, तशीच ती अन्य राष्ट्रांनीही घेणे अपेक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार विविध देशांनी ती घ्यायलाही सुरूवात केली आहे. एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला इतरांपासून वेगळे करून त्यावर उपचार सुरू करण्याची सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या आहेत, त्यानुसार गोव्यातही हा वेगळा विभाग सुरू करण्यात आलेला आहे. याचा अर्थ गोव्यामध्ये या विषाणूचा सुळसुळाट झाला आहे असे नव्हे. आरोग्य खात्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून यासंदर्भातील अद्ययावत वैद्यकीय संशोधनावर आणि निर्माण होणार्या औषधांवर लक्ष ठेवून केंद्र सरकारच्या मदतीने ती गरज भासल्यास गोव्यात लागलीच उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. मात्र, त्याच बरोबर उगाच या विषाणूबाबत जनतेमध्ये घबराट पसरवली जाणार नाही याची काळजीही सर्वांना घ्यावी लागेल.