>> ‘मेकर ऑफ मॉडर्न गोवा’ पुस्तकाचे प्रकाशन
गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या कारकीर्दीत गोव्याला प्राप्त झालेल्या घटक राज्याचा दर्जा ही खरोखर अमूल्य अशी भेट होती. हा दर्जा प्राप्त झाल्यानंतर गोव्याच्या विकासाची दिशा शीघ्रगतीने पुढे गेली. विकासाचा मार्ग मोकळा झाला. गोव्याला आपल्यापरीने विकासाची कास धरण्याची संधी उपलब्ध झाली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रकल्पाच्या विकासाचा पाया मजबूत झाला. सत्तरीच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी मतदारांवर भरभरून प्रेम केले. म्हणूनच त्यांना पन्नास वर्षे राजकारण करण्याची संधी उपलब्ध झाली असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या 85 व्या वाढदिवसाप्रीत्यर्थ त्यांच्या धर्मपत्नी विजयादेवी राणे यांनी लिहिलेल्या ‘मेकर ऑफ मॉडर्न गोवा’ या पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. जवळपास 40 हजारांच्या आसपास उपस्थित नागरिकांतच्या साक्षीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भूमिका मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला गोव्यातील बहुतेक सर्वच आमदार, माजी मुख्यमंत्री, सरकारच्या विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. सावंत, केंद्रीय मंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, प्रतापसिंह राणे यांच्या धर्मप्रत्नी व पुस्तकाच्या लेखिका विजयादेवी राणे, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, प्रतापसिंह राणे यांच्या स्नुषा डॉ. देविया राणे, त्यांच्या कन्या विश्वधारा डहाडुणकर यांची खास उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, पर्यावरणाशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता पर्यावरणाला प्राधान्य देणारे हे व्यक्तिमत्व आज बदलत्या राज्याच्या विकासाबरोबरच येथील जैवविविधता संवर्धित करून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. येणाऱ्या 100 वर्षापर्यंत त्यांचा अनुभव गोव्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल असे स्पष्ट करून त्यांना सुयश चिंतिले.
या पुस्तका संदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना विजयादेवी राणे यांनी, एक वर्षांमध्ये हे पुस्तक पूर्ण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याचे सांगितले. प्रतापसिंह राणे हे आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे. आपल्या संयमी व कणखर भूमिकेमुळे त्यांनी सातत्याने मतदारांच्या हृदयामध्ये आदराचे स्थान प्राप्त केले. त्यांचे आत्मचरित्र समाजासमोर यावे असे अनेकांची इच्छा होती. मात्र त्यांनी याला पूर्णपणे नकार दिल्यानंतर ही जबाबदारी आपल्यावर आली व सर्वांच्या सहयोगाने ती आपण यशस्वीपणे पार पाडली अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. सदर पुस्तक पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचे आशा व्यक्त केली.