घटकराज्य दिनापर्यंत गोवा 100 टक्के साक्षर

0
3

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त; गोव्याच्या साक्षरतेची टक्केवारी पोहोचली 94 टक्क्यांवर

2022 ते 2027 या कालावधीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेले ‘नवभारत साक्षरता अभियान’ सामाजिक बांधिलकी जपत गोव्यात वेगाने राबविले जात आहे. या अभियानातून गोव्याने संपूर्ण देशासमोर आदर्श ठेवला आहे. सध्या गोव्याच्या साक्षरतेची टक्केवारी जवळपास 94 टक्के आहे. राज्यातील कामगारवर्ग आणि ज्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही असे नागरिक ज्यांची संख्या 6 टक्के आहे, ते लवकरच साक्षर होतील आणि संपूर्ण गोवा येत्या घटकराज्य दिन म्हणजेच 30 मेपर्यंत 100 टक्के साक्षर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. दरम्यान, यापूर्वी 19 डिसेंबर 2024 पर्यंत गोवा 100 टक्के साक्षर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

एससीईआरटी आणि शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्वरीत एससीईआरटी इमारतीत 26 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ‘उल्लास मेळा 2025′ या नवभारत साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, नियोजन सांख्यिकी आणि मूल्यांकन विभागाचे संचालक विजय सक्सेना, शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर, प्रशासन विभाग एससीईआरटीच्या संचालिका सरिता गाडगीळ, जीईडीसीचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यातील निरक्षरांचा शोध घेऊन त्यांना साक्षर बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या नवभारत साक्षर योजनेखाली गोवा सरकारने काम हाती घेतलेले असून, एससीईआरटीद्वारे त्यांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत, अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली.
या योजनेखाली गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील लोकांनाही सामावून घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेखाली 30 मेपर्यंत 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ण करणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नवभारत साक्षर अभियानाच्या माध्यमातून ‘गोंय आमचे भांगराचे’ म्हणत गोमंतकीय लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडविणारा नवशिक्षितांनी सादर केलेला बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम ‘उल्लास मेळा 2025′ आकर्षणाचा विषय ठरला. नवसाक्षरांना शिकविण्यासाठी अध्यापकांना उपयुक्त असलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलेले होते.

यावेळी नवभारत साक्षर अभियानाच्या माध्यमातून नवशिक्षितांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निवडक दहा जणांचा प्रमाणपत्र देऊन आणि त्यांना शिकविणाऱ्या स्वयंसेवक शिक्षकांचा, उल्लास मेळा 2025 मध्ये योगदान देणाऱ्या महाविद्यालयांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान
करण्यात आला.

बालभवनच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी स्वागत केले. दिलीप वझे यांनी सूत्रसंचालन केले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

भारतीय राज्यघटनेने सर्वांना बोलण्याचा, शिकण्याचा आणि अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा हक्क दिलेला आहे. नवभारत साक्षर अभियान या देशातील प्रत्येक नागरिक शिक्षित झाला पाहिजे यासाठी आहे. येत्या घटक राज्य दिनापर्यंत गोवा या नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून 100 टक्के साक्षर होईल.
100 टक्के साक्षर होणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असेल. नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून नवशिक्षितांना केवळ शिकविले जात नाही, तर त्यांची परीक्षाही घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यालाच साक्षर ठरवले जाते.