ग्वादारवरील हल्ला

0
26

पाकिस्तानच्या ग्वादार बंदरावर बलुचिस्तानी दहशतवाद्यांनी नुकत्याच केलेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण खबरबात पाकिस्तानी लष्कराने जगापर्यंत जरी पोहोचू दिली नसली, तरी एकूण घटनेचे प्रत्यक्षदर्शींनी केलेेले वर्णन, त्यावेळी झालेला अंदाधुंद गोळीबार, एकामागून एक झालेले स्फोट हे सगळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याइतकीच ह्या हल्ल्याची तीव्रता दर्शवतात. पाकिस्तानने हा हल्ला हाणून पाडल्याचा दावा जरी केला असला, तरी पाकिस्तानच्या मालकीच्या आणि चीनद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या बंदरावरील ह्या हल्ल्यातून बलुची नागरिकांमधील तीव्र असंतोषालाच जणू वाचा फुटली आहे. दहशतवाद हा शेवटी वाईटच असतो. त्यामुळे आठ दहशतवाद्यांनी चढवलेल्या ह्या हल्ल्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही, परंतु ह्या निमित्ताने बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांची जी लूट चीन पाकिस्तानच्या मदतीने करू पाहत आहे, तो विषय निश्चितच ऐरणीवर आलेला आहे. जे पेराल ते उगवते असे म्हणतात. पाकिस्तानने बलुचिस्तानची नेहमीच उपेक्षा केली. नैसर्गिक वायू, कोळसा, खनिजे यांनी समृद्ध असून देखील बलुचिस्तानला सदैव दुय्यमपणे वागवले गेले. बलुची नागरिकांवर पाकिस्तानने आजवर केलेल्या अत्याचारांची तर सीमाच नाही. चीनच्या वन बेल्ट वन रोडसारख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेला पाठबळ देण्यासाठी ग्वादार बंदर विकसित करून पाकिस्तानने जणू बलुचिस्तानच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर डल्ला मारण्याचाच प्रयत्न चालवलेला आहे. त्यामुळे बलुच दहशतवादी संघटनांनी ह्या बंदराला लक्ष्य बनवले ह्यात आश्चर्य नाही. खरे म्हणजे हे ग्वादार एकेकाळी ओमानने भारताला देऊ केले होते, परंतु तेव्हा ती भेट नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताने भौगोलिक दूरीमुळे नाकारली होती. मात्र, पुढे पाकिस्तानने ओमानकडून तो भाग विकत घेतला आणि काही वर्षांपूर्वीच चीनने आपले हित जोपासण्यासाठी तेथे बंदर विकसित केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पलीकडे इराणच्या छबाहर बंदराचा विकास केला आहे हे वाचकांना ज्ञात असेलच. ग्वादारवरील ह्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ह्या दहशतवादी संघटनेच्या मजीद ब्रिगेडने स्वीकारली आहे. हा दहशतवादी गट स्थापन होऊन एक तप उलटले आहे. अधूनमधून तो आपले अस्तित्व दाखवून देत असतो. झुल्फिकार अली भुत्तोंच्या ज्या अंगरक्षकाने त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता व तो मारला गेला होता. त्याचे नाव मजिद असे होते. त्याच्याच नावाने ही ब्रिगेड ओळखली जाते हे येथे उल्लेखनीय आहे. अलीकडच्या काळात ह्या दहशतवादी गटाकडून असे इतर हल्ले झाले आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तानमधील चिनी प्रकल्पांना लक्ष्य केले जात आहे. दुसरी कुख्यात दहशतवादी संघटना तेहरिक इ तालिबान पाकिस्तान ही देखील पाकिस्तान सरकारची डोकेदुखी बनली आहे. गेली काही वर्षे पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ह्या दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या आहेत आणि पाकिस्तानलाच धडा शिकवू लागल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यापासून त्यांना तेथे आश्रय मिळू लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकमेकांशी सीमेवर झुंजत असल्याचे चित्र अधूनमधून पाहायला मिळते. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या नावाखाली एकमेकांच्या हद्दीत हल्ले चढवले जात असतात. पाकिस्तानात हैदोस घालणाऱ्या दहशतवादी गटांना अफगाणिस्तानमध्ये आसरा मिळू लागला आहे. अफगाणिस्तानच्या खोस्त आणि आजूबाजूच्या प्रांतांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. उत्तर वझिरीस्तानमध्ये हाफीज गुलबहादूर गट सक्रिय आहे. डेरा इस्माईल खानवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये काही पाकिस्तानी सैनिकही ठार झाले होते. सातत्याने हे दहशतवादी हल्ले चढवले जात आहेत. पाकिस्तान अजूनही आर्थिक आणि राजकीय संकटातून सावरलेला नाही. तेथे आता नवे सरकार जरी सत्तारूढ झालेले असले, तरी आर्थिक स्थिती कमकुवतच आहे. त्यामुळे नुकताच सर्व मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांना काटकसरीचा फतवा काढण्यात आलेला आहे. एकीकडे देशाचे अर्थकारण आणि प्रशासन असे डळमळलेले असताना दहशतवादी शक्ती डोके वर काढणारच. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी गट पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, सूड उगवण्यासाठी अशा कारवाया वाढवतील असे दिसते. तेहरिक इ तालिबान पाकिस्तानशी झालेली युद्धबंदी नोव्हेंबर 2022 मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर सातत्याने त्या आणि इतर दहशतवादी गटांकडून पाकिस्तानवर इथे ना तिथे हल्ले सुरूच आहेत. हा रोष जसा पाकिस्तानच्या राजवटीविरुद्ध आहे, त्याहून अधिक तो चीनच्या वर्चस्ववादाविरुद्धही आहे!