ग्रेटर पणजी पीडीएप्रश्नी भाजपचा गोवा फॉरवर्ड पार्टीला पूर्ण पाठिंबा आहे, असे काल भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारातील घटक पक्षाचे नेते व नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई हे ग्रेटर पीडीएप्रश्नी योग्य काय तो निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास असून याप्रश्नी भाजप सरदेसाई यांच्या पाठीशी राहणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.
ग्रेटर पणजी पीडीए प्रश्नावरून गोवा फॉरवर्ड पार्टी व विजय सरदेसाई हे वादाच्या भोवर्यात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारानी सदानंद शेट तानावडे यांना छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ग्रेटर पणजी पीडीएचा वाद सध्या चिंघळलेला आहे. सांतआंद्रे व सांताक्रुझ ह्या दोन्ही मतदारसंघातील लोकांनी ह्या पीडीएला पूर्ण विरोध केलेला असून दोन्ही मतदारसंघांना पीडीएतून वगळण्यात यावे, अशी लोकांची मागणी आहे.
दत्तप्रसादांचे ‘ते’ वैयक्तीक मत
दरम्यान, भाजपचे ताळगांव मंडळाचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यानी ताळगांव मतदारसंघही पीडीएतून वगळण्यात यावा, अशी जी मागणी केलेली आहे त्यासंबंधी पक्षाची भूमिका काय आहे, असे पत्रकारांनी विचारले असता ताळगांव ग्रेटर पीडीएमध्ये असावे अशी पक्षाची भूमिका आहे. दत्तप्रसाद नाईक यांचे जे मत आहे ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे तानावडे म्हणाले.