ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव

0
15

>> 10 दिवसांत सुधारणा न झाल्यास काँग्रेसकडून आंदोलन छेडण्याचा इशारा

राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य साधन सुविधांचा अभाव असून, येत्या 10 दिवसांत आरोग्य साधन सुविधांमध्ये सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिला.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने राज्यातील विविध भागांतील आरोग्य केंद्रांवरील आरोग्य साधन सुविधांच्या अभावाबाबत एक निवेदन आरोग्य संचालकांना काल सादर केले. राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य साधन सुविधांमध्ये तातडीने सुधारणा घडवून आणण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कुडचडे, तुये आदी अनेक भागातील आरोग्य केंद्रांमध्ये साधनसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना त्रास सहन करावे लागत आहेत, असा आरोप पाटकर यांनी केला.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्या सत्रात आरोग्य खात्याच्या उपसंचालिका डॉ. रूपा नाईक यांच्याशी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांबाबत चर्चा करून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर यांची भेट होऊ न शकल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संध्याकाळच्या सत्रात पुन्हा आरोग्य संचालनालयात धाव घेतली. डॉ. काकोडकर यांच्यावरही प्रश्नांचा भडिमार केला.
आरोग्य खात्याच्या संचालकांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. येत्या 10 दिवसांत आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा न केल्यास आंदोलन केले जाणार आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव आहे. तथापि, राज्य सरकारला आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे, असा टोला पाटकर यांनी हाणला.

गोव्याच्या आरोग्य खात्याला पुरस्कार
नवी दिल्ली येथील पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या एनजीओने गोव्याला ‘नॉन-हाय फोकस लार्ज श्रेणी’ अंतर्गत आरोग्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य घोषित करून 7 वा जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार जाहीर केला आहे. येत्या 18 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.