डिचोली (न. प्र.)
गोवा सुरक्षा मंच येत्या दसर्याच्या मुहूर्तावर गोव्यातील ३५ मतदारसंघामध्ये तळागळातील कार्यकर्ते जोडण्याच्या तसेच बूथ संघटना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘बूथ चलो अभियान राबवणार आहे. दसरा ते दिवाळीपर्यंत चालणार्या या अभियानाअंतगंत राज्यात पक्षाचे कार्य प्रत्येक मतदार व नागरिकांपर्यंत पोहोचविताना सध्याचे सत्तेवरील सरकार कशा पद्धतीने फोल ठरलेले आहे. याबाबत लोकांमध्ये जागृती करणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक बूथवरील समस्यांना तोंड फोडण्यासाठीही विशेष प्रयत्न या अभियानाच्या दरम्यान केले जातील, अशी माहिती गोवा सुरक्षा मंच पक्षाचे राज्य अध्यक्ष आत्माराम गावकर यांनी डिचोली येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डिचोली मतदारसंघाचे प्रदेशाध्यक्ष भोलानाथ गाड, मये मतदारसंघ अध्यक्ष धीरज सावंत, राज्यसचिव सुरेश परवार, सुनील पिळगावकर, सदाशिव सामंत, दत्ताराम हरमलकर आदींची उपस्थिती होती.
गोव्यात राजकीय अराजकता
गोव्यातील राजकीय पातळीवर सध्या अराजकता माजलेली आहे. मंत्र्यांच्या आजारपणामुळे व खुर्ची न सोडण्याच्या वृत्तीमुळे प्रशासन पूर्णपणे कोसळलेले आहे. भ्रष्टाचाराचे प्रकार वाढत चालले असून त्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे सध्या गोव्यातील जनतेसमोर अंधःकारमय परिस्थिती उभी आहे, असे आत्माराम गावकर यांनी सांगितले.
आता ‘गोवा सुरक्षा मंच’ हाच पर्याय
गोव्यात सध्या दिशाहिन राजकारण व राज्यहिताचा विचार न करणारे राजकारणी यामुळे संस्कृतीचा र्हास चाललेला आहे. शिक्षण क्षेत्राचा प्रवास भरकटत चालला आहे. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना प्रचंड उदासिनता वाढलेली आहे. अशा भीषण संकटात सध्या गोवा सापडला असताना प्रशासन ठप्प होणे व राजकारण दिशाहिन झाले आहे. हे वातावरण भविष्यात गोव्यासाठी घातक आहे. म्हणून आज गोव्यासमोर केवळ ‘गोवा सुरक्षा मंच’ हा एकच राजकीय पर्याय असल्याचे आत्माराम गावकर यांनी सांगितले.