गोष्ट ः एक मौलिक साहित्यप्रकार

0
2
  • अभिषेक गाडगीळ
    साखळी

बऱ्याच दिवसांपासून ‘एकदा काय झालं’ हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट पाहायची इच्छा होती. अखेरीस काही दिवसांपूर्वी हा योग जुळून आला. ‘गोष्ट’ या प्रकाराचं जगातील संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते अतिशय सुंदरपणे या चित्रपटातून मांडलं आहे. कथा, पटकथा, संवाद, गाणी सर्वच बाबतीत अतिशय सरस असलेला हा चित्रपट वडील-मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकतो. सर्वकाही चांगलं सुरू असताना या वडील-मुलाच्या आयुष्यात एक असं वळण येतं ज्यामुळे दोघांचंही आयुष्य बदलून जातं. चित्रपटाच्या शेवटी डोळे पाणावून येतात.
या चित्रपटात सुमित राघवन व ऊर्मिला कोठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुख्य कलाकार व इतर सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद व संगीत; संदीप खरे यांचे शब्द; शंकर महादेवन, सुनिधी चौहान व शुभंकर कुलकर्णी यांचे स्वर या इतर जमेच्या बाजू आहेत. गेल्याच वर्षी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून ‘गोष्ट’ या प्रकाराचं केवळ आपल्या भारतीयच नव्हे, तर जगातील विविध संस्कृतींमधल्या महत्त्वावर लिहावं असं वाटलं, त्यासाठी हा लेखनप्रपंच.


लहानपणी आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनीच आपल्या आई-बाबांकडून, आजी-आजोबांकडून गोष्टी ऐकल्या असतील. रात्री झोपण्याआधी गोष्ट ऐकणं म्हणजे आपल्या नित्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग होता त्याकाळी. बरं, आपलं ठरलेलं असायचं की कोणत्या गोष्टी ऐकायच्या, आणि आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा न कंटाळता आपली इच्छा पूर्ण करायचे. एक वेळ अशीही यायची की आपल्याला सांगता येतील अशा गोष्टी त्यांच्याजवळ नसायच्या. मग ते आपल्याला अनेक गोष्टी तयार करून सांगत व त्या गोष्टींमध्ये आपण सर्व रमून जात असू.
शाळेत असताना जेव्हा कथाकथन स्पर्धा व्हायच्या, तेव्हा मी स्वतः अनेकवेळा बक्षिसे मिळवली आहेत. या गोष्टी पंचतंत्र, इसापनीती,अरेबियन नाईट्स, रामायण, महाभारत, विविध पुराणे, उपनिषदांमधील असायच्या. मला स्वतःला वाचनाची आवड ही गोष्टींची पुस्तके वाचूनच लागली. चंपक, चांदोबा ही मासिके वाचून अनेक पिढ्यांचे बौद्धिक मनोरंजन व ज्ञानरंजन झाले आहे. त्यातील ‘चंपक’ हे मासिक आजही लहान मुलांचे मनोरंजन करत आहे. अशी अनेक मासिके आहेत जी हिंदी, इंग्रजी व इतर अनेक भाषांमध्ये प्रकाशित होतात व शेकडो मुलांवर चांगले संस्कार करण्याचं कार्य करतात.


वरील परिच्छेदात मी रामायण व महाभारताचा उल्लेख केला. प्रामुख्याने जर आपण महाभारत समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये असंख्य कथा आहेत. विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे ही कथांच्या माध्यमातून दिली गेली आहेत. प्रश्नोत्तरांव्यतिरिक्त कथा हे एक उपयुक्त माध्यम म्हणून वापरलं गेलं आहे. जेव्हा पांडव वनवासात होते, तेव्हा त्यांनी विविध ऋषींकडून उपदेश व मार्गदर्शन घेतले. त्यात कथाकथन हेच प्रमुख माध्यम होते. महाभारत हेच मुळात कथा स्वरूपात सांगितले गेले आहे. याव्यतिरिक्त आपल्या भारतात जातक कथादेखील प्रसिद्ध आहेत.
आपल्या देशातील प्रत्येक भाषेत प्रचंड असं साहित्य उपलब्ध आहे. त्याचा दर्जा एवढा उत्तम आहे की दूरचित्रवाणीवरील अनेक अजरामर मालिका या विविध साहित्यिकांच्या कथा-कादंबऱ्यांवर निर्मित झाल्या आहेत. चित्रपटही त्याला अपवाद नाही. अशाने एक फायदा झाला तो म्हणजे आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या भारतीय साहित्याचा प्रचार व प्रसार करणं सोपं झालं.
आजच्या डिजिटल युगात ‘गोष्ट’ या प्रकारासमोर काही आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याला काही कौटुंबिक व इतर कारणे आहेतच. पण ती आव्हाने ओळखून त्यावर उपाय करणे हे आपले कर्तव्य आहे. कारण जगात भले कितीही जरी बदल झाले, तरी काही अशा गोष्टी असतात, ज्यांचं महत्व कधीही कमी होत नाही. ‘गोष्ट’ ही त्यातलीच एक बाब आहे.