गोव्यावर पराभवाचे सावट

0
130

>> रणजी करंडक क्रिकेट
बिपुल शर्माचे शतक

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोव्याचा संघ चंदीगडविरुद्ध पराभवाच्या छायेत आहे. गोव्याच्या पहिल्या डावातील २५१ धावांना उत्तर देताना चंदीगडने आपला पहिला डाव ७ बाद ५८० धावांवर काल मंगळवारी घोषित केला. दुसर्‍या डावात गोव्याची २ बाद ८७ अशी स्थिती झाली आहे. गोव्याचा संघ अजून २४२ धावांनी पिछाडीवर असून गोव्याचे केवळ ८ गडी बाकी आहेत.

दुसर्‍या दिवसअखेर चंदीगडने ३ बाद ३१० धावांपर्यंत मजल मारली होती. शिवम भांब्री १४८ व अंकित कौशिक ४ धावा करून नाबाद होते. लक्षय गर्गने शिवमला वैयक्तिक १५७ धावांवर बाद करत काल गोव्याला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. कौशिक (८३) व बिपुल शर्मा (नाबाद १०३) यांनी पाचव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी करत गोव्याच्या स्वैर मार्‍याचा खरपूर समाचार घेतला. गोव्याकडून अमित वर्मा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ९५ धावांत ३ गडी बाद केले. तिसर्‍या दिवशी गोव्याने दुसर्‍या डावात आदित्य कौशिक (१५) व स्मित पटेल (४०) या पाहुण्या खेळाडूंना गमावले आहे. सुमीरन आमोणकर २१ व अमूल्य पांड्रेकर ६ धावांवर नाबाद आहेत.