गोव्याला हरित उद्योगांचे प्रमुख केंद्र बनवणार : मुख्यमंत्री

0
5

>> ताळगाव-बांबोळी येथे अमेझिंग गोवा ग्लोबल बिझनेस परिषदेचे उद्घाटन

गोवा राज्याला हरित उद्योगांचे प्रमुख केंद्र बनविण्याचा मानस आहे. राज्यात हरित ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांना पाठिंबा दिला जाणार आहे. गोवा राज्यात व्यवसाय सुलभ करणे, व्यवसायासाठी अनुकूल धोरणे वाढविणे, राहणीमान सुधारणे आणि पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. ताळगाव-बांबोळी येथे व्हायब्रंट गोवा फाउंडेशन आणि गोवा सरकार यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अमेझिंग गोवा ग्लोबल बिझनेस परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

गोवा राज्य एआय, फार्मास्युटिकल्स, अपारंपरिक ऊर्जा आणि आयुर्वेद यासारख्या हरित उद्योगांच्या शोधात आहे. अमेझिंग गोवा ग्लोबल बिझनेस समिट आशादायक परिणाम देईल. गोव्यातील व्यवसायांना जागतिक व्यासपीठ प्रदान करेल आणि मौल्यवान वैचारिक देवाणघेवाण वाढवेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

गोवा केवळ पर्यटन व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नाही. येथील नयनरम्य निसर्ग, मूलभूत सोयी सुविधा, महामार्ग, दोन विमानतळ, रेल्वे, बंदर आदींमुळे येथे उद्योग करणे सोयीस्कर झाले आहे. गेल्या काही वर्षात येथे अन्न प्रक्रिया व अन्य हरित उद्योग वाढत आहेत. गोवा वेडिंग डेस्टिनेशनही बनत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योजकांनी गोव्यात येऊन हरित उद्योगांत गुंतवणूक करावी. आम्हांला गोव्याला देशाचा आर्थिक केंद्रबिंदू बनवायचे आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच, युवा पिढीला नवीन आव्हाने पेलण्यासाठी तयार करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग खात्यातर्फे गोव्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी वेगवेगळी धोरणे आखली जात आहेत. गोव्याला देशाचे ट्रेडिंग हब बनवायचे आहे, असे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

या कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आभासी पद्धतीने संवाद साधला. गोव्यात मिनी सिलिकॉन व्हॅली आणण्याचा विचार केला जात आहे. हे एक प्रकारचे डेटा सेंटर स्टोरेज असणार आहे. गोव्यातील पर्यावरणपूरक उद्योगांना केंद्र सरकार पाठिंबा देणार आहे, असेही गोयल यांनी सांगितले.
यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, जीसीसीआयचे अध्यक्ष तथा उद्योगपती श्रीनिवास धेंपो, विनय वर्मा, राजकुमार कामत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत 51 देशांतील 200 हून अधिक उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.