गोव्याला येत्या १९ डिसेंबरपूर्वी स्वयंपूर्ण बनवणार ः मुख्यमंत्री

0
49

>> ‘सरकार आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

येत्या १९ डिसेंबरपूर्वी म्हणजेच गोवा मुक्तिदिनाच्या ६० व्या वर्धापनदिनापूर्वी गोवा स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट गोवा सरकारने ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गोमंतकीय जनतेचे पूर्ण सहकार्य सरकारला हवे आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. थिवी मतदारसंघातील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात गोवा सरकारने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमाच्यावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, मुख्य सचिव परिमल राय, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय, महसूल खात्याचे सचिव संजय कुमार, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, उत्तर गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर, पिळर्णच्या सरपंच रिया नाईक, कोलवाळचे सरपंच नित्यानंद कांदोळकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, नो युवर स्कीम या नावाने एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यामुळे घरबसल्या या पोर्टलवर जाऊन सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. आता प्रत्येक पंचायत क्षेत्रात स्वयंपूर्ण मित्र मदत करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करत आहेत. स्टार्टअप सारख्या योजनाचा आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाखांपर्यंत सरकारी मदत मिळू शकणार आअसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या योजना पोचवणे हाच ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.