- शंभू भाऊ बांदेकर
आपला गोवा पोर्तुगिजांच्या हुकूमशाही जोखडातून मुक्त झाला व गोव्याला विचारस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याबरोबर स्वैराचाराचे स्वातंत्र्य तर मिळाले नाही ना, असा प्रश्न मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पोर्तुगीज अमदानीत पोलीसांवर हात उगारणे तर सोडाच, पण पोर्तुगीज नव्हे तर स्थानिक पोलिसांनी देखील डोळे वटारले तर लोकांना जरब बसायची.
राज्याचे पर्यटन धोरण निश्चित करताना पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, संस्था व नागरिकांच्या पर्यटनाबाबत सूचना, संकल्पना विचारात घेतल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन नुकतेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. स्तुत्य अशीच ही बाब म्हणावी लागेल. गोवा माइल्सच्या ट्रॅव्हल्स माइल्स या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पर्यटन धोरणाचे सूतोवाच केले आहे.
गोव्याचा एक पर्यटन केंद्र म्हणून गेली २०-२५ वर्षे जो दबदबा देशात तसेच जागतिक नकाशावर होता, तसा दुर्दैवाने तो आता राहिलेला दिसत नाही. गोवा हा अत्यंत निसर्गरम्य, येथील समुद्रकिनारे, धबधबे, मंदिरे, गिरिजाघरे, येथील शांती, अतिथी देवो भव ही संकल्पना हळूहळू इतिहासजमा तर होत नाही ना, अशी शंका आल्यावाचून राहत नाही आणि याचे कारण म्हणजे वेबसाईट माध्यमाद्वारे गोव्याचा ‘सेक्स पर्यटनस्थळ’ म्हणून जो बोलबाला होत आहे, तो गोव्याचे नाव बदनाम करीत आहे. अनेक संघटना त्याविरुद्ध सरकार व पोलिसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. खुद्द सत्ताधारी आघाडीत होते ते माजी मंत्री व विद्यमान आमदार विनोद पालयेकर, विद्यमान मंत्री मायकल लोबो आदिंनी गोव्याला आपल्या कवेत घेऊ पाहणारा अंमली पदार्थांचा विळखा, वाढता वेश्याव्यवसाय, ‘सनबर्न’च्या नावाने चाललेला धुमाकूळ या बाबत अनेकवेळा सरकारची कानउघडणी केली आहे. पण याला आळा बसलेला दिसत नाही. आता तर खुद्द राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी याबाबत पोलीस खात्याच्या वरिष्ठांना आदेश दिले आहेत. नजीकच्या भविष्यकाळात या ‘मानवी तस्करी’चा गोव्याला पडलेला विळखा काबूत आणला गेला नाही, तर गोव्याचे आणि गोंयकारांचे काही खरे नाही, कारण गोव्यातील अनैतिक धंद्यामुळे देश विदेशातील चांगले पर्यटक गोव्यात येण्याचे टाळत आहेत. याचा परिणाम म्हणून विदेशी पर्यटकांची संख्या पंचवीस ते तीस टक्के घटल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. म्हणूनच की काय, भारतात येणार्या परदेशी पर्यटकांच्या २०१९ सालासाठीच्या यादीत गोव्याचा समावेश पहिल्या दहा स्थळांत नाही.
काही देशी विदेशी नागरिक तर ‘पर्यटन’ या गोंडस नावाखाली खाओ, पिओ, मजा करो म्हणून शरीराचे चोचले पुरवण्यासाठीच गोव्यात येतात. अशा पर्यटकांची संख्याही दहा-पंधरा लाखांपेक्षा कमी नसावी आणि म्हणूनच पर्यटनातील अनैतिक गोष्टींना प्रतिबंध करण्याची नितांत गरज आहे. पर्यटकांना निसर्गरम्य गोवा, येथील सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारे, मनमोहक धबधबे, यांच्या सोबतीला गोवन फिश-करी राईस, गोव्यातील रुचकर भाज्या यांची मेजवानी दिली तर गोव्याचा फायदा आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या पाहिजेत. येथून अंमली पदार्थ व्यवहाराचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय येथील बिघडलेली आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेली परिस्थिती आटोक्यात येणे कठीण आहे.
आपल्या देशात अंमली पदार्थांच्या व्यवहारात पंजाब हे राज्य अग्रेसर आहे, ही गोष्ट खरी असली तरी गोवा व महाराष्ट्र राज्यांनाही या अंमली पदार्थांच्या विळख्याने आपल्या कवेत घेतले आहे. आपल्या पोलिसांनी आणि अंमलीपदार्थविरोधी पथकाने वेळोवेळी पोळे, कोलवा, कळंगुट, हणजूण, बागा, आश्वे-मांद्रे, मोरजी आदि समुद्रकिनार्यांवर जे छापे घातले, त्यावरून ही गोष्ट लक्षात येते. आजची गोव्याची स्थिती पाहता आपल्या लक्षात येते की, गोव्यातील जवळजवळ सर्व समुद्रकिनारे हे नायजेरियन, रशियन, इस्त्रायली विदेशी नागरिकांनी बळकावले. त्यांच्याबाबत कसून चौकशी केली गेली, तर अनेक गोष्टी नक्कीच उघड होतील, यात शंकाच नाही.
गेल्या जुलैमध्ये एका कार्यक्रमानिमित्त मी पुण्यात होतो. तर तेथील वर्तमानपत्रामध्ये नायजेरियन, कॅनेडियन या विदेशी नागरिकांकडून लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याच्या बातम्या ठळकपणे झळकत होत्या. मग राज्यातील धनदांडगे युवक याला बळी पडतात व आपल्या जिवाची व घराची नासाडी करून घेतात.
३१ डिसेंबरला तर ‘थर्टीफर्स्ट’ साजरे करण्याच्या नादात माथेरानच्या पेव किल्ल्यावर मद्यपान करून धिंगाणा घालणार्या मुंबईच्या अकरा तरुणांना अक्षरशः बदडण्यात आले. दारु आणि गांजा पार्टी करणार्या व धांगडधिंगाणा घालणार्या या तरुणांना शिवप्रेमींनी पकडले आणि चांगलाच चोप देऊन नंतर पोलिसांच्या हवाली केले. किल्ल्यावर जाऊन पर्यटक तेथे दारु-गांजाच्या नशेत धांगडधिंगाणा घालतात असा शिवप्रेमींचा आरोप असून पोलीसांनी वेळोवेळी भेट देऊन किल्ल्याचे पावित्र्य राखावे, अशी सूचना त्या शिवप्रेमींनी पोलिसांना केली.
आपल्या गोव्यात नायजेरियनांनी राडा केल्याचे आपण पाहिले आहे, देशी पर्यटक उघड्यावर, धबधब्याशेजारी, समुद्रकिनार्यांवर धांगडधिंगाणा घालतात हेही आपणास माहित आहे. परवा तर कुंकळ्ळी येथे स्थानिकांना पहाटे तीन वाजेपर्यंत नशापाणी करताना पोलिसांनी हटकले तर पोलिसांनाच मारहाण करून सरकारी वाहनांची मोडतोड केल्याचे वृत्त झळकले होते. पोलिसांनी नंतर त्यांना अटक केली ही गोष्ट निराळी.
आपला गोवा पोर्तुगिजांच्या हुकूमशाही जोखडातून मुक्त झाला व गोव्याला विचारस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याबरोबर स्वैराचाराचे स्वातंत्र्य तर मिळाले नाही ना, असा प्रश्न मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पोर्तुगीज अमदानीत पोलीसांवर हात उगारणे तर सोडाच, पण पोर्तुगीज नव्हे तर स्थानिक पोलिसांनी देखील डोळे वटारले तर लोकांना जरब बसायची. विद्यार्थीवर्ग तर खाकी वर्दीतल्या पोलिसांना पाहून इथे-तिथे न पाहता सरळ आपल्या वाटेने जायचे. खून-खराबा तर नावापुरताही नसायचा. भांडणतंटे सामोपचाराने मिटवण्यावर भर असायचा. भाऊबंदकीसुद्धा वैरत्वाला फाटे फुटणार नाहीत अशा पद्धतीने वागायचे. आता हे सारे इतिहासजमा झाले आणि नशिबी आले ते विचार स्वातंत्र्याच्या, आचार-विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली गोव्याची अस्मिता, भारतीय संस्कृती आणि चांगल्या रुढी परंपरा पायदळी तुडवण्याचे वारे!
आपला मुक्त गोवा बेबंदपणे कुठे बरे वाटचाल करीत आहे? प्रगतीकडे की अधोगतीकडे? विकासाकडे की विनाशाकडे? कृषी संस्कृतीकडे की विकृत संस्कृतीकडे? पर्यटनाच्या नावाखाली आपल्याला भरपूर महसूल मिळतो, हे खरे. पण हा महसूल देताना पर्यटक नको ते व्यवहार करून चौपट वसूल करतात हे नाकबूल करून कसे बरे चालेल?
म्हणून मुख्यमंत्र्यांनी पर्यटन धोरण निश्चित करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो निश्चितपणे स्वागतार्ह आहे. हे धोरण निश्चित करताना पर्यटकांची सुरक्षा, अतिथ्यशीलता याला महत्त्व दिले पाहिजेच, पण त्याचबरोबर पाणी टंचाई, वीजेचा लपंडाव, आरोग्याच्या गैरसोयी यांचा त्यांना त्रास होता कामा नये. विशेष म्हणजे अंमली पदार्थांत गुंतलेल्या, वेश्याव्यवसाय, पर्यटनातील इतर अनैतिक गोष्टी यांना प्रतिबंध होईल असे पर्यटन धोरण अत्यावश्यकच आहे. सरकारने हे धोरण धोरणीपणाने व कठोरपणे पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!