>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची ग्वाही; मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा स्वीकारला
गोव्याला देशाची ‘पर्यटन राजधानी’ बनवणे हे आपले स्वप्न असून, केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील आपल्या सरकारच्या माध्यमातून हे स्वप्न आपण सत्यात उतरवणार आहे. त्याबरोबरच राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी व राज्यातील युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पर्वरी येथील मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
निसर्गाने नटलेले आपले छोटसे गोवा राज्य हे देशातील पर्यटनाची राजधानी होऊ शकते आणि गोव्याला हा दर्जा प्राप्त करून देणे हे आपले स्वप्न असून, त्यासाठी आपण अथकपणे प्रयत्न करणार असल्याचा निश्चय मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
गोव्याला स्वंयपूर्ण बनवण्याचे स्वप्नही पूर्ण झालेले नसून, त्यासाठी हाती घेतलेले काम आता पूर्णत्वाकडे न्यायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खाण उद्योग सुरू करणार
राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याचे एक मोठे आव्हान देखील समोर असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.