गोव्याला केरोसिन कोटा वाढवून देण्याची केंद्राकडे मागणी ः गावडे

0
154

गोव्याला आणखी ३७ किलो लिटर एवढे केरोसिन वाढवून देण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी नागरी पुरवठा खात्याने केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली.

केंद्राने यापूर्वीच राज्याला ३७ किलो लिटर एवढा कॅरोसिन कोटा वाढवून दिलेला आहे. त्यामुळे राज्याला मिळणारा केरोसिन कोटा ९६ किलो लिटरवर पोचला आहे. मात्र, तो राज्याला अपुरा पडत असलने आम्हाला आणखी ३७ किलो लिटर एवढा कोटा वाढवून देण्यात यावा, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. राज्याला किती किलो लिटर एवढा केरोसिन कोट्याची गरज आहे, असे विचारले असता १२० किलो लिटर असे गावडे यांनी सांगितले. १२० किलो लिटर एवढे केरोसिन राज्याला मिळाले तर राज्याची गरज पुरी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान रेशनकार्डवर कडधान्ये देण्यासंबंधीचा प्रस्ताव नागरी पुरवठा खात्याने सदर दरबारी पाठवला असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे गोविंद गावडे यांनी काल सांगितले.