हवामान खात्याने येत्या 31 मेपर्यंत केरळात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे गोव्यात 4 ते 5 जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राजधानी पणजीसह साखळी, मये, हळदोणा, वास्को व इतर भागांत काल पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने 19 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर, 31 मेपर्यंत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसांनी गोव्यात मान्सून दाखल होतो. राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मान्सूनपूर्व पाऊस व जोरदार वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटनांची नोंद होत आहे. हवामान विभागाने राज्यात येत्या 18 मेपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यात चोवीस तासांत पणजी येथे 34.8 अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे 35 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंद झाले. आगामी दोन दिवस कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
विजेच्या धक्क्याने एका पर्यटकाचा मृत्यू
मिरामार-पणजी येथील समुद्रकिनाऱ्यावर अवकाळी पावसाच्या वेळी कोसळलेल्या विजेचा धक्का लागून एका पर्यटकाचा मृत्यू झाला. ही घटना 14 मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अखिल विजयन (35 वर्षे, रा. एर्नाकुलम-केरळ) असे या पर्यटकाचे नाव असून, शवविच्छेदन अहवालातून त्याचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी संध्याकाळी केरळमधील अखिल विजयन हे आपल्या कुटुंबीय व मित्रांसह मिरामार समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. किनाऱ्यावर फिरताना अचानक रात्री साठेआठच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजयन, त्यांचे कुटुंबीय कारकडे येत असताना विजयन, त्यांची पत्नी आणि मित्र अचानकपणे जमिनीवर कोसळले. काही वेळाने विजयन याची पत्नी आणि मित्र शुद्धीवर आले; मात्र विजयन हे निपचित पडले. त्यामुळे तातडीने 108 रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. प्रचंड ताकदीचा विद्युत झटका आणि त्याच्या प्रभावामुळे विजयन यांचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी सर्व सोपस्कर पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयाकडे सुपूर्द केला.