>> आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांच्याकडून स्पष्ट
गोवा विधानसभा, जिल्हा पंचायत, नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या तथा दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी नावेली-मडगाव येथे पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बोलताना काल केली. आता, काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, आपच्या ह्या निर्णयामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाली असून, एकला चलो रे हे धोरण पक्षाने स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे.
आम आदमी पक्ष पहिल्यांदा जिल्हा पंचायत आणि नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. त्यानंतर गोवा विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी करीत आहे. 2022 च्या निवडणुकीत आपचे दोन आमदार निवडून आले आहेत. दोघेही आमदार कुठल्याही आमिषाला बळी न पडता लोकसेवा करीत आहेत, असेही आतिशी यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. काँग्रेस पक्षाचे मागील विधानसभा निवडणुकीत 11 आमदार निवडून आले होते. त्यातील 8 आमदार फुटून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी काँग्रेसचे 10 आमदार फुटले होते. कॉँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन नंतर स्वार्थासाठी पक्षांतर केलेल्या आमदारांनी मतदारांना फसविले आहे, असेही आतिशी यांनी सांगितले.