>> गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे प्रतिपादन
आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांची भूमिका महत्त्वाची आहे. गोवा राज्यामध्ये शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोनापावल येथील राजभवनाच्या दरबार सभागृहात आयोजित गोवा विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभात बोलताना काल केले.
यावेळी राज्यपाल, गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कुलगुरू प्रा. हरिलाल बी. मेनन यांची उपस्थिती होती.
गोवा विद्यापीठातून पदवी घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एकूण पदवी घेणाऱ्यांपैकी 55 टक्के मुली आहेत. तर, सुवर्णपदक विजेत्यांपैकी 60 टक्के मुली आहेत. ही एक चांगली गोष्ट असून मुली पुढे जात असल्याचे पाहून आनंद वाटतो, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.
गोवा विद्यापीठ नवोन्मेषला चालना देत आहे. आपल्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान सारख्या क्षेत्रात जागतिक दर्जाची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. गोवा विद्यापीठ, उच्च शिक्षण संचालनालय ‘समग्र शिक्षण आणि आभासी अभिमुखतेसाठी डिजिटल एकात्मिक प्रणाली’ हा कार्यक्रम राबवत आहे याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.
गोवा विद्यापीठाच्या परिसरात विविध विभागांचे एकत्रीकरण करून आंतरविद्याशाखीय अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभाग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाबद्दल राष्ट्रपतींनी गोवा विद्यापीठाची प्रशंसा केली.
गोवा विद्यापीठाने ‘उन्नत भारत अभियान’अंतर्गत पाच गावे दत्तक घेतली आहेत त्याविषयी राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. या अभियानाअंतर्गत या गावांमध्ये शाश्वतता मॉडेलचा अवलंब करून शिंपले आणि अळंब्यांचे उत्पादन घेतले जाते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समावेशन आणि पर्यावरण संतुलन याबाबत जागरूकता निर्माण केल्याबद्दल राष्ट्रपतींंनी गोवा विद्यापीठाचे कौतुक केले.
दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. तुम्ही मिळविलेल्या पदव्या तुम्हांला रोजगार मिळवण्यास किंवा व्यवसाय सुरू करण्यास मदत करतील मात्र, एक गुण जो तुम्हांला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकते तो म्हणजे कधीही हार न मानणे. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे यावर त्यांनी भर दिला. एक निरंतर शिकणारी व्यक्ती संधींचा फायदा घेऊ शकते तसेच आव्हानांवर मात करू शकते. आजची तरुणाई ‘संकल्प काळ’मध्ये विकसित भारत घडवेल असे सांगत भारताला अधिक समृद्धीकडे नेण्याचे स्वप्न ते पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्र प्रथम ही भावना
जोपासा ः राज्यपाल
विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांची मोठी जबाबदारी आहे. युवा वर्गाने राष्ट्र प्रथम ही भावना जोपासली पाहिजे. गोवा विद्यापीठाने कालानुरूप नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहे. तसेच विदेशी विद्यापीठांशी शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सामंजस्य करार केले जात आहेत, असे राज्यपाल, कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात 9290 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जात आहे. 1859 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, 116 विद्यार्थ्यांना डिप्लोमा आणि 61 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट प्रदान केली जात आहे, असे कुलगुरू मेनन यांनी सांगितले.