गोव्यात येणार्‍या रशियन पर्यटकांच्या संख्येत वाढ

0
88

राज्यात येणार्‍या रशियन पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१६ साली ३,७६,९५७ रशियन पर्यटकांनी राज्याला भेट देऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटला.
राज्यात येणार्‍या रशियन पर्यटकांची संख्या सतत वाढतच असून २०१२ साली गोव्यात येणार्‍या रशियन पर्यटकांची संख्या ३३ टक्क्यांनी वाढली होती. तर गेल्या वर्षी म्हणजेच २०१६ साली गोव्यात येणार्‍या रशियन पर्यटकांची संख्या तब्बल ५५ टक्क्यांनी वाढली. २०१६ साली गोव्यात विक्रमी ३,७६,९५७ रशियन पर्यटक आले. २०१७ सालचा पर्यटन मोसम पुढील महिन्यापासून सुरू होणार असून यंदा गेल्या वर्षाचा विक्रम मोडत सुमारे ४ लाख रशियन पर्यटक राज्यात येण्याची शक्यता पर्यटन खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.
युरोपीयन राष्ट्रांमधून मोठ्या संख्येने गोव्यात चार्टर्ड विमाने येत असतात. गेल्या वर्षी युरोपीयन राष्ट्रांमधून ६१४ चार्टर्ड विमाने ऑक्टोबर १६ ते मे १७ या दरम्यान गोव्यात आली. युरोपीयन राष्ट्रांतून आलेल्या ह्या ६१४ चार्टर्ड विमानातून १,६०,७२८ रशियन पर्यटक गोव्यात आले. आता पुढील महिन्यापासून गोव्यात पर्यटन मोसम सुरू होत असुन ह्या पर्यटन मोसमातही मोठ्या संख्येने रशियन पर्यटक गोव्यात येणार असल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले.