>> मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज; उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता; पंजाबमध्ये आम आदमी पक्ष दाखवणार करिश्मा
उत्तर प्रदेशमधील अंतिम सातव्या टप्प्यातील मतदानानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काल अखेर संपली. आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागून राहिली असून, काल विविध वाहिन्या आणि संस्थांनी कोणत्या पक्षाला कुठल्या राज्यात किती जागा मिळणार, याबाबत मतदानोत्तर चाचण्यांतून अंदाज वर्तवला. बहुतेक वाहिन्या व संस्थांच्या सर्वेक्षणानुसार गोव्यात भाजप आणि कॉंग्रेसला समसमान जागा मिळणार असून, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. परिणामी मागच्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशात भाजपची, तर पंजाबमध्ये आपची सत्तेचा येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पाचही राज्यांतील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी काल सायंकाळी मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात कोणत्या पक्षाला कुठल्या राज्यात किती जागा मिळतील, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मतदानोत्तर चाचण्यांनी काही पक्षांना दिलासा दिला आहे, तर काहींना धडकी भरवली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. राज्यात यंदाच्या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, आप, रिव्होल्युशनरी गोवन्स, तृणमूल कॉंग्रेस या ७ प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. परिणामी मतविभागणी होऊन धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. तसेच मतविभागणीमुळे गोव्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता सुरुवातीपासूनच वर्तवली जात होती, हीच बाब मतदानोत्तर चाचण्यांतून अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच भाजप व कॉंग्रेसला थोड्याफार समसमान जागा मिळतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पी-मार्कच्या मतदानोत्तर चाचणीनुसार भाजपला १३ ते १७ आणि कॉंग्रेसला देखील १३ ते १७ जागा मिळतील. जन की बातच्या चाचणीनुसार भाजपला १३ ते १९, तर कॉंग्रेसला १४ ते १९ जागा मिळतील. वेटोच्या चाचणीनुसार भाजपला १४ आणि कॉंग्रेसला १६ जागा मिळतील. सीएनएक्सच्या चाचणीनुसार भाजपला १६ ते २२, तर कॉंग्रेसला ११ ते १७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केवळ सीएनएक्सच्या चाचणीतच भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.
उत्तर प्रदेशात
पुन्हा भाजपची सत्ता
उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल समोर आले आहेत. त्यात मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर जाहीर करणार्या सर्व संस्था आणि वाहिन्यांनी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे योगींचा करिश्मा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
पंजाबमध्ये‘आप’ची सत्ता
ज्या पंजाबने गेली एक वर्ष देशाचे राजकरण ढवळून काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी विधेयकावरुन झुकायला लावले, तिथे सत्ताधारी कॉंग्रेसला बाजूला सारुन अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सत्तेत येईल, असा अंदाज सर्वच संस्था आणि वाहिन्यांनी वर्तवला आहे. पंजाबमध्ये कॉंग्रेस दुसर्या आणि भाजप तिसर्या स्थानावर फेकले जातील, असा अंदाज आहे.
उत्तराखंड, मणिपूरमध्ये काय होणार?
उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता येणार असून, कॉंग्रेस आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर होईल, असा अंदाज आहे. दुसरीकडे मणिपूरमध्ये देखील भाजपला सत्ता मिळेल, असे भाकित मतदानोत्तर चाचण्यांतून वर्तवण्यात आले आहे.