गोव्यात बहुमताने भाजपचेच सरकार येणार ः नड्डा

0
25

>> डिचोलीत भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात

केंद्रात आणि राज्यात भाजपचे दुहेरी इंजिन असल्यामुळे गोव्यात विकासाची गाडी भरधाव वेगाने धावत आहे. प्रतिकूल परिस्थितीत डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा उत्तमपणे हाताळली असून पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळवून देण्याचे आवाहन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. डिचोली मतदारसंघ भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नड्डा बोलत होते.

शांतताप्रिय गोव्यात अनेक मंदिरे, चर्च असून त्यामुळे विविधतेतून एकता याचे गोव्यातूल दर्शन घडते. गोव्याचे मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा स्वप्नातील गोवा मुख्यमंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत पुढे नत असल्याचे सांगून पर्रीकरांचा जोश सावंतांमध्ये दिसत असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज देशाने सर्वच बाबतीत विकास साधला आहे. राज्यात अनेक पूल रस्ते विमानतळ आदी अनेक प्रकल्प साकार होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत इतर पक्ष खोटा प्रचार करीत असल्याचे सांगून पुन्हा पुढील सरकार भाजपचेच असेल असा विश्‍वास व्यक्त केला. डिचोली तालुक्याचा सर्वतो विकास साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर निवडणूक प्रभारी टी. रवी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, खासदार सय्यद जाफर, सभापती राजेश पाटणेकर, नरेंद्र सावईकर, सतीश धोंड, संतोष मळीक, विश्वास गावकर, शिल्पा नाईक, शर्मिला पळ, डॉ. शेखर साळकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, वासुदेव परब आदी विविध मान्यवर उपस्थित होते.
ढोल ताशांच्या गजरात नड्डा यांचे व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

स्वागत विश्वास गावकर यांनी केले. सभापती पाटणेकर यांनी, भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ता अध्यक्षच नव्हे तर पंतप्रधानही बनू शकतो हे भाजपने सिद्ध केल्याचे सांगितले. गोव्यात भाजप कधीच सत्तेवर येणार नाही असे म्हटले जात होते. मात्र मनोहर पर्रीकर यांच्यामुळे राज्यात भाजप सत्तेवर आला.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही विचार मांडले. सदानंद तानावडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी केले.