गोव्यात प्रतिसाद नाही

0
251

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात काल पुकारण्यात आलेल्या भारत बंदला गोव्यात प्रतिसाद मिळू शकला नाही. राज्यातील सर्व शहरांतील बाजारपेठा, वाहतूक तसेच खासगी आणि सरकारी कार्यालये तसेच सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू होते.
पणजी शहरातील आझाद मैदानावर आयटक तसेच अखिल भारतीय किसान सभा यांच्या गोवा शाखेने आयोजित केलेल्या निदर्शनांत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला.

सार्वजनिक बससेवा, टॅक्सी सेवा, रिक्षा सेवा तसेच अन्य सर्व व्यवहार सुरळीत चालू असल्याने राज्यातील लोक तसेच पर्यटकांचीही चांगली सोय झाली. मंगळवारच्या देशव्यापी बंदमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होईल की काय अशी भीती काल व्यक्त करण्यात येत होती. सर्व बाजारपेठा खुल्या असल्याने रोज विक्री करून चार पैसे कमावणारे भाजी, मासळी, फळ व फुल विक्रेते यांच्यासह सर्व विक्रेत्यांची चांगली सोय झाली.

बंदच्या काळात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रस्ते अडवणे, हिंसा यासारखे प्रकार घडू नयेत यासाठी गोवा पोलिसांनी ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. भारत बंदचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी स्पष्ट केले होते.

दरम्यान, आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, प्रसन्न उटगी व सुहास नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल आयटक व अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य पदाधिकार्‍यांनी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या निदर्शनात भाग घेतला.