– रमेश सावईकर
राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची गोवा प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने राज्यांतील कॉंग्रेसचे नेते-कार्यकर्ते यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, अशी प्रतिक्रिया आजी-माजी कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. गेले वर्षभर प्रदेशाध्यक्षपदाचा भार सांभाळणारे जॉन फर्नांडिस यांनी पक्षामध्ये शिस्त आणण्याच्या नावाने जी कृती केली, त्याचे समर्थन कॉंग्रेस जनांकडून झाले नाही. जुने बाजूला सारून नवे निर्माण करण्याचा हेतू ठेवून जॉन फर्नांडिस यांनी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते रवी नाईक, जोकिम आलेमाव, आलेक्स सिक्वेरा यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलला. युवा कॉंग्रेस अध्यक्षा तथा चर्चिल कन्या वालंका आलेमाव यांची उचलबांगडी केली. एवढेच काय तर कॉंग्रेस गट समित्या बरखास्त करून ते मोकळे झाले. ही सारी कृती पक्षात शिस्त आणण्याच्या नावांसाठी फर्नांडिस यांनी केली. भालचंद्र नाईक नावाच्या व्यक्तीची साथ घेऊन खुद्द कॉंग्रेस भवनात त्याच्या मुखातून विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे व आमदार विश्वजीत राणे यांच्याविरुद्ध खाण उद्योगासंबंधी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास भाग पाडले. भले भालचंद्र नाईक यांना कॉंग्रेस नेत्यांविरुद्ध जे आरोप करायचे होते ते करू देत. पण त्यासाठी कॉंग्रेस भवन हे स्थान नव्हे. पक्षशिस्तीच्या बाता मारणारे फर्नांडिस यांची पक्षशिस्त त्यावेळी कोठे गेली होती असा प्रश्न उपस्थित होतो.
जॉन फर्नांडिस यांची जेमतेम वर्षभराची कारकीर्द ही वादग्रस्तच नव्हे तर कॉंग्रेस पक्षांतर्गत खदखद निर्माण करणारी ठरली. पक्ष मजबूत, सशक्त करण्याऐवजी तो आणखी शक्तिहीन झाला. त्याची जबाबदारी फर्नांडिस यांच्यावर आपसूकच येते. प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टीची मागणी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्य केल्यानंतर आता फर्नांडिस यांचे विरोधक गप्प बसलेले नाहीत. पक्षाविरुद्ध काम करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे जॉनची राजकीय कारकिर्दीची घटका भरल्यात जमा आहे!
लुईझिन फालेरो गेली सात वर्षे स्थानिक राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहिले. २००७ मध्ये बाणावली मतदार संघातून चर्चिल आलेमाव यांच्याकडून ते पराभूत झाले. तथापि त्यांनी कॉंग्रेससाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन सोनियाजींनी त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले. मध्यंतरीच्या काळात फालेरोंनी गोव्यात येऊन प्रदेशाध्यक्षपदाची धुरा वाहावी अशी सोनियाजींची इच्छा होती. पण फालेरोंनी ती ऑफर नाकारली. पण या खेपेस आपला नाईलाज झाला म्हणून सोनियाजींचा शब्द पाळावा लागला असे फालेरोंनी स्पष्ट केले ते बरे झाले.
फालेरो यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याने जॉन फर्नांडिस यांचे पित्त खवळले. फालेरो कुटुंबियांविरुद्ध टीकेची तोफ डागून त्यांनी स्वतःला धन्य मानले. अर्थात यामुळे काही विपरीत परीणाम होण्याची शक्यता मुळीच नाही. कारण लुईझिन फालेरोंनी गोव्याचे मुख्यमंत्री असताना आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. नेतृत्वपदाचे गुण त्यांच्यात आहेत. त्यांची कार्यपद्धतीही प्रभावी आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता कॉंग्रेस पक्षाला फालेरोंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे काम तेवढ्याच राजकीय चतुराईने त्यांना करावे लागेल. गत विधानसभा निवडणुकीच्या काळी राज्यातील युवा मतदार भारतीय जनता पक्षाकडे ओढला गेला. महागाई, भ्रष्टाचार, खाण प्रश्न, प्रदूषण, घोटाळे आदी प्रश्नांचे भांडवल करून भाजपाने आपली पोळी भाजून घेतली. राष्ट्रीय पातळीवरची ‘कॉंग्रेस हटाव’ची लाट गोव्यातही तेवढ्याच तीव्रतेने थडकली. म्हणून तर राज्यांत कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट होण्याची नामुष्की पत्करावी लागली. पराभवातून आत्मपरिक्षण करून कॉंग्रेसची परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. पण नेमके उलटे झाले. पक्ष बांधणीचे काम करण्यात अपयश आलेले नेते बाजूला सारले गेले नि जॉन फर्नांडिस यांच्यावर पक्षाध्यक्ष सोनियाजींनी विश्वास टाकून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली. पक्ष आणखी विस्कळीत करण्याचे काम मात्र त्यांनी चोखपणे बजावले. अशी सद्य परिस्थिती आहे. ती नीट ओळखून पक्षातील आजी-माजी नेते, पक्षापासून फारकत घेतलेले कार्यकर्ते, तळागाळातील जनता यांच्याशी संवाद साधून पक्ष पुनर्बांधणीचे काम त्यांना करावे लागेल! कॉंग्रेस पक्षजनांमध्ये नीतिमत्ता उंचावण्याचे काम सर्वप्रथम करून निराश- हताश बनलेल्यांमध्ये उत्साह निर्माण केल्याशिवाय पक्ष संघटनेचे काम सुरू करणे फालेरोंना सहज शक्य होणार नाही. पक्षात सक्रीयपणे, निष्ठेने वावरल्यास त्याची दखल घेऊन जबाबदारीचे पद मिळण्याची शाश्वती किंवा अपेक्षा बाळगण्यास जागाच नसेल तर युवा कार्यकर्ते पक्षाकडे आकृष्ट होणार नाहीत. जुन्याकडून पक्षाची जबाबदारी नव्यांकडे सुपूर्द करण्याची निरपेक्षता, राजकीय निस्वार्थ पक्षनेत्यांनी दाखविल्याशिवाय पंचायत जिल्हा पातळीवर नवे नेतृत्व तसे आपसूक पोहोचणे शक्य होणार नाही, याची कल्पना युवा नेत्यांना जरूर असते. पण किमान महत्त्वाच्या पदांपर्यंत मजल मारण्यास वाव असल्यासारखी परिस्थिती दृष्टीपथात नसेल तर युवकांनी कोणत्या अपेक्षेने पक्षकार्य करायचे? या महत्त्वपूर्ण बाबींवर प्रदेशाध्यक्ष फालेरो यांना गंभीरपणे विचार करावा लागेल. त्यासाठी त्याचा प्रदीर्घ राजकीय सेवानुभव, पक्षाध्यक्षा सोनिया गांधीजींचे गेल्या सात वर्षांत लाभलेले मार्गदर्शन, राजकीय परिपक्वता निश्चितच उपयोगी पडेल.
पक्षातील ज्येष्ठ-कनिष्ठ नेत्यांमध्ये संपर्क-संवाद घडवून आणून त्यांना एकत्र आणण्याचे कामही फालेरोंना करावे लागेल. पक्षाचे आमदार, जिल्हा व गट समितीचे पदाधिकारी गेले वर्षभर एकत्र आलेच नाही. जॉन फर्नांडिस यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात पणजीचे ‘कॉंग्रेस भवन’ बंदच राहिले. त्याचा उपयोग झाला तो पक्षातीलच नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी कोणा भालचंद्र नाईक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तीर मारण्यात! एवढीच काय ती कॉंग्रेस भवनातील जागरुकता म्हणावी लागेल. फालेरोंना कॉंग्रेस भवन पक्षनेते व पक्षजनांसाठी सताड उघडे ठेवून पक्षकार्यासाठी उपलब्ध ठेवावे लागेल. पक्षांतर्गत मते-वाद, साधक-बाधक बाबी, परस्परांवरती आरोप-प्रत्यारोप याची पडताळणी करून त्याचा सोक्षमोक्ष वेळीच लावण्याचे तेवढेच जोखमीचे काम फालेरोंना करावे लागेल.
पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य स्तर, जिल्हा व तालुका पातळीवर समित्या निवडून त्यांच्यावर जबाबदारी सोपविणे, तसेच त्यांना अधिकार देणे, कार्यकर्त्यांना त्यांची ज्येष्ठता, पात्रता, कार्यक्षमता लक्षात घेऊन पदे देणे आदी बाबी प्रथमतः कराव्या लागतील. कॉंग्रेस पक्षांचे मनोधैर्य, विश्वास आणि संघटना पुनर्बांधणीचे काम प्रभावीपणे, पूर्ण ताकदीनिशी आणि जनतेच्या पाठबळावर मार्गी लागून प्रगतीपथावर नेण्याची मोठी जबाबदारी प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्यावर आहे. आपली कार्यक्षमता, सक्षमता, पात्रता फालेरो यांनी सिद्ध करून दाखविली तरच गोव्यात कॉंग्रेस पक्षाला ‘अच्छे दिन’ पाहायला मिळतील!