पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषेदत दिली. यावेळी पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांसोबत क्रीडामंत्री गोविंद गावडे व ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा उपस्थित होत्या. यावेळी ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव अमिताभ शर्मा व कल्याण चौबे हेही हजर होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन 23, 24 अथवा 25 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
या स्पर्धा जरी ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान होणार असल्या तरी या स्पर्धांसाठीची साधन सुविधा उभारून पूर्ण करण्याचे काम 15 जुलैपर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले. नंतर ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत या साधन सुविधांवर अखेरचा हात फिरवण्याबरोबरच हे दोन महिने अधिक तयारीसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, ऑलिंम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने साधनसुविधा तसेच खेळाडूंसाठीच्या सुविधांची पाहणी केली असून त्यासंबंधी समाधान व्यक्त केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्पर्धेच्या तांत्रिक समितीचे शिष्टमंडळ 27, 28 व 29 एप्रिल रोजी गोव्याला भेट देऊन पाहणी करणार आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
काही क्रीडा प्रकार महाराष्ट्रात : गावडे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद जरी गोव्याकडे असले तरी काही साधन सुविधांअभावी नेमबाजी, गोल्फ व ट्राय सायकलिंग हे तीन क्रीडा प्रकार महाराष्ट्र राज्यात होतील, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. या संबंधीचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.