गोव्यात अल्पसंख्याक आयोगाची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

0
82

राज्यपालांना निवेदन सादर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळाने काल गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन गोव्यात अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करण्याची सूचना राज्य सरकारला करावी अशी विनंती करणारे एक निवेदन त्यांना दिल्याचे पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
राज्यातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेच्या नजरेने या आयोगाची स्थापना होणे ही काळाची गरज असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी राज्यपालांच्या नजरेत आणून दिले. या आयोगाची स्थापना झाल्यास राज्यातील अल्पसंख्याकांच्या मनात असुरक्षिततेची जी भावना आहे ती दूर होऊ शकेल. अल्पसंख्याकांच्या आयोगासाठी केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात येत असते. गोव्यात हा आयोगच नसल्याने तो निधीही राज्याला मिळू शकत नाही. हा निधी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी वापरता येतो, असे डिमेलो यांवेळी बोलताना म्हणाले.
मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख, पारशी, जैन आदी धर्मातील लोक अल्पसंख्याक असल्याचे अधिसूचित करण्यात आले आहे. गोव्यात अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या ऑगस्ट महिन्यात केली होती. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपल्या जाहिरनाम्यातून राज्यात अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांना या आश्‍वासनाचा विसर पडला असल्याचा आरोप डिमेलो यांनी केला.
राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे आघाडी सरकार सत्तेवर असताना तुम्ही या आयोगाची स्थापना का केली नाही असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता तेव्हा राज्यात अल्पसंख्याकांच्या मनात असुरक्षिततेची भावना नव्हती. त्यामुळे तेव्हा या आयोगाची गरज भासली नव्हती, असे ते म्हणाले. राज्यात अल्पसंख्याकांना काहीही स्थान राहिले नसल्याचा आरोपही योळी डिमेलो यांनी केला. भाजपमधील अल्पसंख्याक आमदार अल्पसंख्याकांसाठीच्या आयोगाची मागणी करीत नसल्याबाबत त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला पक्षाचे अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर व सरचिटणीस जुझे फिलीप डिसोझा हेही पत्रकार परिषदेला हजर होते.