केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गोव्यात अणू ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार चालवला आहे, अशी माहिती केंद्रीय नगर व्यवहार व गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल आपल्या गोवा भेटीदरम्यान घेतलेल्या एका बैठकीत दिली.
जलविद्युत आणि सौर ऊर्जेवर आधारित वीज प्रकल्पांच्या खूप मर्यादा असतात ही गोष्ट लक्षात घेऊन गोव्यात अणू ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या शक्यतेवर विचार सुरू असल्याचे खट्टर यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक विभाग हा विजेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनवणे हे सरकरचे उद्दिष्ट आहे. भारतात अणू ऊर्जेद्वारे 8 गिगावॅट एवढ्या विजेची निर्मिती केली जात आहे. 2047 सालापर्यंत हे प्रमाण 100 गिगावॅटवर नेण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सूर्यगृह योजनेखाली गोव्यात 2026-27 पर्यंत घरांवर 22 हजार सौर पॅनल बसवण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगरविकासमंत्री विश्वजीत राणे हेही उपस्थित होते.
अणू ऊर्जा प्रकल्पास तीव्र विरोध : काँग्रेस
केंद्र सरकारच्या गोव्यात अणू ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नांना काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील व निसर्गसौंदर्याने भरलेल्या गोव्यावर अणू ऊर्जा प्रकल्प लादण्याचा भाजपच्या डबल इंजिन सरकारने प्रयत्न केल्यास त्याला सर्व शक्तिनिशी विरोध केला जाईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल दिला.
अशा प्रकारचे भयानक प्रयोग करण्यासाठी गोवा ही प्रयोगशाळा नव्हे, हे भाजप सरकारने लक्षात ठेवावे. भाजप सरकारने यापूर्वीच गोव्यातील शेती, डोंगर नष्ट केलेले आहेत. नद्यांमध्ये कॅसिनो जहाजे आणलेली आहेत. आणि आता अणू ऊर्जा प्रकल्प उभारून हे सरकार राज्यातील लोकांचे जीवन धोक्यात घालू पाहत आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.
जगाने चर्नोबिलसारख्या जीवघेण्या दुर्घटनांचा अनुभव घेतलेला आहे. अणू ऊर्जा प्रकल्पात एक छोटीशी दुर्घटना घडली, तरी हजारो लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. कित्येक पिढ्यांना त्याचे भयानक परिणाम भोगावे लागू शकतात, असे पाटकर यांनी म्हटले.
काँग्रेसचा या प्रकल्पाला जोरदार विरोध असेल. केंद्र सरकारने हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर, विधानसभेत आणि न्यायालयात तीव्र लढा देऊ, असा इशाराही पाटकर यांनी दिला आहे.
सर्व गोमंतकीय, पर्यावरणवादी संघटनांनी या प्रकल्पाविरोधात एकत्र यावे. हा लढा केवळ पर्यावरण वाचवण्यासाठीचा लढा नसून, हे गोव्याच्या अस्तित्त्वासाठीचे आंदोलन असेल, असेही पाटकर यांनी म्हटले आहे.